नवी दिल्ली : दिल्लीची रोशनी... हिजाबी बायकर म्हणून ती सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅक लेदर जॅकेट, जीन्स, हाय हील्स बूट घातलेली रोशनी जेव्हा बाईक चालवते तेव्हा रस्त्यावरचे लोक तिच्याकडे बघतच राहतात... रोशनीच्या डोक्यावर सुरक्षेसाठीचं हेल्मेटही असतं... आणि तिची धर्मावरची श्रद्धा दाखवणारा हिजाबही... 


'मी माझ्या संस्कृतीला मानते... पण, बायकिंग ही माझी पॅशन आहे...' असं रोशनी म्हणते. रोशनी 'जामिया मिलिया इस्लामिया'ची विद्यार्थिनी आहे. ती विद्यापीठात अरेबिक अॅन्ड कल्चरल स्टडीजमध्ये एमए करतेय. 


ती बाइक राइडर्स ग्रुप 'विंडचेजर्स' आणि 'दिल्ली रॉयल एनफील्ड राइडर्स'ची सदस्य आहे... रोशनीने नववीत असताना पहिल्यांदा बाईकचं हॅन्डल पकडलं. कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळताच कॉलेजमध्ये जाण्यासाठी तिनं वडिलांकडे बाईक मागितली. रोशनीचे वडीलही रायडर आहेत. त्यांनी रोशनीला अॅव्हेंजर घेऊन दिली. पण, रोशनीनं पाच महिन्यात ती बाईक विकून टाकली आणि नवी स्पोर्टस बाईक घेतली. 


सध्या रोशनी 250 सीसीची 'होंडा सीबीआर रिपसॉल' चालवते. या बाईकची किंमत दोन लाख एव्हढी आहे. 'ड्युकाटी' ही तिची ड्रीम बाईक आहे. संपूर्ण जगभर बाईकनं फिरण्याचं तिचं स्वप्न आहे. रोशनीच्या मैत्रिणींनाही आता तिच्यामुळे प्रेरणा मिळतेय. 
 
हिजाब आणि हेल्मेट घालून बाईक राईड करणाऱ्या रोशनीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  परंपरांच्या चौकटीत राहूनही नव्या विचारसरणीचा संदेश रोशनी देतेय.