पुण्यातील इंजिनिअरला फेसबुक मैत्रिणीने घातला ११ लाखांचा गंडा
शहरातील एका आयटी इंजिनिअरला चक्क त्याच्याच मैत्रिणीने 11 लाख रुपयांना फसविले आहे. फेसबुक मैत्रिणीला मदत करण्याच्या नादात तो फसला गेला. त्याला तिच्यावर विश्वास दाखल्याने महागात पडले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे : शहरातील एका आयटी इंजिनिअरला चक्क त्याच्याच मैत्रिणीने 11 लाख रुपयांना फसविले आहे. फेसबुक मैत्रिणीला मदत करण्याच्या नादात तो फसला गेला. त्याला तिच्यावर विश्वास दाखल्याने महागात पडले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यातील एका कंपनीतील आयटी इंजिनिअरची फेसबुकवरून एका मुलीशी मैत्री झाली. दिवसागणिक त्यांची मैत्री बहरु लागली. दोघेही आधी फेसबुकच्या माध्यमातून चॅटींग करु लागले. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही दिले. त्यावर सातत्याने बोलणे व्हायचे. ती त्याला सांगायची की मला भारतात यायचे आहे. भारतात स्थायिक व्हायचे असून, त्यासाठी मदत करण्याची तिने त्याला विनंती केली. ती भारतात आल्याचा तिने बनाव केला आणि पुण्यातील आयटी इंजिनिअर चक्क फसला गेला. तोही 11 लाख रुपयांना.
आपण भारतात आल्याचे फेसबुकवरील त्या तरुणीने आयटी इंजिनिअरला सांगितले. मात्र, त्याचवेळी तिला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचा फोन आला.
डिसेंबर 2016 मध्ये आयटी इंजिनिअरला एक फोन आला. त्या व्यक्तीने कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमची मैत्रीण सँड्रा दिल्लीत आली असून, तिचे यलो कार्ड हरवले आहे. तिच्याकडे दोन अॅपल मोबाईल, दोन लॅपटॉप, हिऱ्याचे दागिने, ४७ हजार पौंड असा ऐवज मिळाला आहे. सॅँड्राला ताब्यात घेतले असून सुटका करायची असल्यास दंड भरावा लागेल, असे बजावले.
आयटी इंजिनिअरने तिच्याशी बोलल्याशिवाय पैसे भरणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना फेसबुक मैत्रिणीचा फोन आला. तिने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगितले आणि मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांने मदतीपोटी जवळपास 11 लाख रुपये बनावट कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या बँकेच्या खात्यावर काही रक्कम भरली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकवरून फोन आल्यानंतर दुसरे कारण सांगितले. तीन वेळा फोन करून त्यांच्याकडून 11 लाख 43 हजार रुपये विविध खात्यावर मागवून घेतले. त्यानंतर आयटी इंजिनिअरने फेसबुक मैत्रिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क झाला नाही. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
याबाबत या आयटी इंजिनिअरने तक्रार दिली आहे. त्यावरून फेसबुक मैत्रिण सॅँड्रा रॉबिन्सन आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवरून लंडन येथील सँड्रा नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती.
सावधानतेचा इशारा
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे तुम्ही योग्य ती काळजी घ्या, असा सल्ला पोलिसांनी दिलाय. ओळख झाल्यानंतर विविध कारणे सांगून फसवणूक केल्याच्या अनेक घटना पुण्यात घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नका. व्यक्तीची प्रत्यक्षात भेट झाल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका. ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळू पडू नका, असे आवाहन सायबर सेलच्या पोलिसांकडून करण्यात आलेय.