मुंबई : विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात लक्ष द्यावं यासाठी पालकांची खटपट सुरूय. पण या पालकांसमोर खरं आव्हान आहे ते मुलांना सोशल मीडियाच्या व्यसनातून कसं सोडवायचं याचं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअपवर सतत चॅट करणं, फेसबुकवर अपडेट राहणं, ट्विट करणं, इन्स्टाग्रामवर फोटोज पाहणं, सेल्फी काढणं... रोजच्या जेवणाएवढ्याच अंगवळणी पडलेल्या या सवयी... पण या सवयी म्हणायच्या की, व्यसन, हे सध्या पालकांना कळेनासं झालंय. दहावी, बारावी परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवणं पालकांना कठिण झालंय. त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याची वेळ पालकांवर आलीय.
 
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचं सोशल मीडियाचं व्यसन कमी व्हावं, म्हणून मानसोपचार तज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिलेत. 


विद्यार्थ्यांशी प्रेमाने बोलून... 


  • विद्यार्थ्यांचा मोबाईल काढून घ्या

  • घरातलं इंटरनेट बंद करा

  • सोशल मीडियाला परीक्षेपूर्वीच बाय बाय करा

  • परीक्षा काळात सोशल मीडियाचा वापर म्हणजे वेळेचा अपव्यय हे पटवून द्या

  • अभ्यासविषयक मेसेज पाहण्यासाठी पालकांनी मुलांची मदत करावी, असे सल्ले ते देतायत.


 


व्हॉटसअपचा सदुपयोग करा... 


सोशल मीडियाचा केवळ गैरवापरच होतो असे नाही तर सध्य़ा शाळा आणि कॉलेजात अभ्यासासाठीही व्हॉट्स अपचा वापर केला जातोय. नोट्स, प्रश्नपत्रिका, अभ्यासातल्या शंका विचारण्यासाठी शिक्षक व्हॉट्स अपवरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे अभ्य़ास करताना तिथल्या तिथे विद्यार्थ्यांची शंका दूर होते.
 
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं प्रचंड दडपण असतं. शिवाय पालकांच्या अपेक्षांचं ओझं... त्यात आवडत्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचं बंधन... त्याचा विपरित परिणाम निकालावर होऊ नये, यासाठी पालकांनीच मुलांशी समजूतदारपणं वागायला हवं...