२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे `तीन तेरा`!
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या `रिंगिंग बेल्स` या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
अध्यक्षांनी दिला राजीनामा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंगिंग बेल्स कंपनीचे अध्यक्ष अशोक चड्ढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आता ते कंपनीत केवळ एक सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. कंपनीचे प्रमोटर मोहित गोयल यांच्याशी त्यांचे मतभेद असल्याचं समोर येतंय. आता यापुढे कंपनीचे सर्व निर्णय गोयलच घेतील.
कामगारांनीही केला 'राम-राम'
इतकंच नाही तर कंपनीचे जवळपास ३०-३५ कर्मचाऱ्यांनीही कंपनीला राम राम ठोकलाय. कंपनी सुरू झाली तेव्हा जवळपास ६० कर्मचारी इथं रुजू झाले होते.
कंपनी आर्थिक पेचात...
२५१ रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचं स्वप्न दाखवलेला हा स्मार्टपोन मार्केटमध्ये आलाच नाही. त्यामुळे, त्यांना डिस्ट्रिब्युटरदेखील मिळालेले नाहीत. अशात कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमनं कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.
प्रत्येक फोनमागे ९० रुपयांचं नुकसान
सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीला फंडिंगासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. कंपनीलाच प्रत्येक फोनची प्रोक्योरमेंट कॉस्ट जवळपास १,२० रुपये पडतेय. म्हणजेच, जर २५१ रुपयांना फोन विकला तर कंपनीला प्रत्येक फोनमागे ९५० रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे. मात्र, यापूर्वी कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनी प्रत्येक फोनमागे ३१ रुपयांचा नफा कमावणार होती.