मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुलगी असो नाही तर मोठी बाई... तिनं 'सातच्या आत घरात' आलं पाहिजे, ही आपली कथित संस्कृती... पण एक भटकी एकटीच जगभ्रमंतीला निघालीय... आत्तापर्यंत तिनं 20 हून अधिक देश पालथे घातलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया साहनी... साधारण पस्तिशीतली... तिला एक भलताच नाद लागलाय... सोलो फिमेल ट्रॅव्हलिंगचा... ती उठते, बॅग भरते आणि एकटीच परदेश प्रवासाला निघते... देश-विदेश फिरायचं जणू वेडच लागलंय तिला... 


आत्तापर्यंत सोनियानं जर्मनी, व्हिएतनाम, अमेरिका, ग्रीस, ब्राझिल, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, टर्की, जॉर्डन, सिंगापूर, कंबोडिया, इजिप्त, थायलंड, श्रीलंका, नेपाळ असे अनेक देश एकटीनंच पालथे घातलेत. 


परदेशात, विशेषतः युरोपात सोलो फिमेल ट्रॅव्हलर म्हणजेच एकट्यानं फिरणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात दिसतात. भारतात मात्र ही संकल्पना आता कुठं रूजायला लागलीय. आपल्याकडं एकटी दुकटी महिला अगदी हॉटेलात जायलादेखील संकोच करते. फार-फार तर भाजी आणायला त्या एकट्यानं जातील... पण फिरायला एकट्या जाणार नाहीत... सोनिया मात्र त्याला अपवाद ठरलीय. 


सोनियाला जगभ्रमंती करताना विविध देशांमध्ये वेगवेगळे अनुभव आले. ते अनुभव ती 'टिकिंग द बकेट लिस्ट डॉट कॉम' या वेबसाइटवर शेअर करते. तिला पॅशन आहे ती भटकण्याची. या वेडाचं आता तिला व्यवसायात रुपांतर करायचंय. त्यासाठी तिनं 'टिकिंग द बकेट लिस्ट' ही केवळ महिलांना परदेश दौरा घडवणारी कंपनी सुरु केलीय.


सोनिया आणि अंकुर

या भटकंतीच्या वेडापायी सोनियानं बँकेतील उच्चपदस्थ नोकरीचा राजीनामा दिला. सोनियाचे पती अंकुर अरोरा यांचाही तिला भरभक्कम पाठिंबा आहे. सोनियाला तिचा छंद जपता यावा, यासाठी त्यांनी तिला कोणत्याही कौटुंबिक जबाबदारीमध्ये अडकून ठेवलेलं नाही हे विशेष...


लग्न, कुटुंब, मुलं याभोवतीच भारतीय महिलांचं आयुष्य संपतं. त्यामुळंच कधीतरी स्वत:साठी आणि स्वत:च्या स्वप्नांसाठीही जगा, असा संदेश देणारी सोनिया इतर चारचौघींपेक्षा वेगळी भासते...