स्नॅपडीलने विद्यार्थ्याला iPhone 5S, ६८ रूपयात दिला
हा फोन तुम्हालाही मिळाला असता.
नवी दिल्ली : स्नॅपडील या कंपनीने एका विद्यार्थ्याला iPhone 5S फक्त ६८ रूपयात दिला, हा फोन तुम्हालाही मिळाला असता जर निखिल बन्सल सारखी हुशारी तुम्ही दाखवली असती.
निखिल बन्सल हा पंजाब विद्यापिठाचा बीटेकचा विद्यार्थी आहे. निखिलसोबत आणि स्नॅपडील सोबत हे पहिल्यांदाच घडलंय, विशेष म्हणजे यासाठी निखिल बन्सलने लाईफ हॅक्स किंवा कॅशबॅक ऑप्शनचा वापर केलेला नाही.
आयफोन खरेदीवर स्नॅपडीलने निखिलला 99.7 टक्क्यांचा डिस्काऊंट दिला आहे. निखिलने १२ फेब्रुवारी रोजी स्नॅपडील वेबसाईटवर किंमत पाहून आयफोन ऑर्डर केला, किंमत फक्त ६८ रूपये होती. यानंतर त्याने संयमाने कोणताही कांगावा न करता, स्मार्टफोन खरेदीचे सर्व पुरावे व्यवस्थित ठेवले, मात्र बरेच दिवस झाले, त्याला मोबाईल फोन मिळाला नाही.
निखिलने स्नॅपडीलला खिंडीत गाठले
निखिल बन्सलला आयफोन मिळालाच नाही. त्याने ग्राहक न्यायलयाचे दार ठोठावले. याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने कंपनीला चांगलेच सुनावले. वेबसाईटवर दाखविल्याप्रमाणे निखिलला फोन देण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यासोबत २ हजार रुपये, अतिरिक्त रक्कम दंडाच्या स्वरुपात देण्याचा आदेशही दिला.
स्नॅपडीलला नडला टेक्निकल प्रॉब्लेम
वस्तूंच्या किमती वेबसाईटवर टाकताना काहीतरी चूक झाल्याने आयफोनची किंमत केवळ ६८ रुपये दिसत होती. यात टेक्निकल किंवा ह्युमन एररही राहू शकतो. याबाबत कंपनीने अद्याप काही सांगितलेले नाही. पण त्याचा नेमका फायदा निखिलने उचलला.
निखिलची हुशारी
निखिलने कंपनीला लगेच मेल करुन चूक दाखवली नाही. मोबाईल खरेदी केल्यावरही कंपनीशी पत्रव्यवहार केला नाही. त्याने वाट बघितली. त्यानंतर थेट कोर्टाचे दार ठोठावले, आणि अखेर कंपनीलाही मानावं लागलं.