मुंबई : मोबाईल अॅप नानूमुळे सध्या मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांची दाणादाण उडाली आहे. नानू हे अॅप फुकटामध्ये कॉलिंगची सुविधा देत असल्यामुळे कंपन्यांनी ट्राय आणि सरकारकडे तक्रार केली आहे. दरम्यान नानू अॅपचे प्रमुख मार्टिन नॅगट यांनी मात्र आम्ही कोणत्याही नियमांचा भंग केला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेलीग्राफ कायद्यानुसार इंटरनेटवर कोणत्याही प्रकारच्या डेटाचं ट्रान्समिशन संचार स्वरुपात करता येतं आणि हे कायदेशीर आहे, असं नॅगट यांनी सांगितलं आहे. 


नानू हे अॅप दिवसभरात एका ठराविक कालावधीसाठी मोबाईल आणि लँडलाईन दोन्ही नंबरवर फुकटात फोन करण्याची सुविधा देत आहे. ही सुविधा अॅप इन्स्टॉल न करताही वापरता येऊ शकते. 


ट्रायनं नेट न्यूट्रिलिटीच्या मुद्द्यावरून मतं मागवायला सुरुवात केली आहे, यामध्ये मोबाईल अॅपवरून करण्यात येणाऱ्या कॉलच्या सुविधेवरही मतं मागवली आहेत. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांची संस्था सीओएआयनं दूरसंचार विभागाकडे मेमध्येच अशा अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.