नवी दिल्ली : चित्रपटात शोभेल अशीच प्रेम कहाणी प्रत्यक्षात उतरलेय. यूपीएसी परीक्षेत दोघेही टॉपर. मात्र, यूपीएसी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतरने पहिली आलेल्या टिनाचे चक्क हृद्य जिंकले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. तो पहिल्याच भेटीत माझ्या प्रेमात पडला, ही प्रतिक्रिया आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून प्रथम येणाऱ्या टिना दाबीची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपीएससी परीक्षेत पहिला आणि दुसरा नंबर मिळवलेले टिना आणि अतर आमिर बोहल्यावर चढणार आहेत. सरकारी सेवेत रुजू होताच दोघांमध्येही लव्ह अॅट फर्स्ट साईट (पहिल्या नजरेतील प्रेम) झाले. ते लवकरच लग्न करणार आहेत. याबाबत टिनाने तसे स्पष्ट केले.


टिना दाबीची ही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटात किंवा कथा-कादंबरीमध्ये शोभणारी आहे. कारण, तिच्या प्रेमात पडणारा दुसरा तिसरा कोणी नसून यूपीएससीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणारा अतहर आमिर उल शफी खान आहे. टिना आणि आमिर दिल्लीच्या केंद्रीय मनुष्यबळ खात्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात पहिल्यांदा भेटले आणि त्याच संध्याकाळी त्याची स्वारी थेट टिनाच्या घरी जाऊन पोहोचली.



आमिरने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे सध्या टिना आणि आमिरची प्रेमकहाणी चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. काश्मीरमधील एका लहानश्या खेड्यातून आलेल्या आमिर आणि मागास समाजातील टिनाने यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता या दोघांची प्रेमकहाणीही तितक्याच चर्चेचा विषय ठरत आहे.


आमिर आणि टिना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांनीही त्यांच्यातील प्रेमसंबंधाबद्दल कोणताही आडपडदा ठेवलेला नाही. टिनाने सोशल मीडियावर आमिरसोबतची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. मात्र, मध्यंतरी यावरून फेसबुकवरील काहीजणांनी टिनावर टीका केली होती. 


अनेकांनी तिच्या आमिरसोबत असलेल्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आम्ही प्रेमात आहोत आणि मी खूप आनंदी आहे. मात्र, फेसबुकवर जेव्हा आमच्याविरोधातील गोष्टी वाचायला मिळतात, तेव्हा मला मनस्ताप होतो. त्यामुळे सध्या आम्ही सोशल मीडियावरील आमच्याबद्दलच्या बातम्या वाचणेच थांबवले आहे. माझ्या मते लोकांच्या नजरेत असल्यामुळे आम्हाला ही लहानशी किंमत मोजावीच लागेल, असे टिनाने म्हटले.


टिना दाबी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. टिना दाबीने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे टिना माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव, अमेरिकेतील भारताच्या माजी राजदूत निरुपमा राव यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान झाली आहे.