पुणे ते कन्याकुमारी : 1500 किलोमीटर केवळ 11 दिवसांत
पुण्याचा रहिवासी असलेल्या आणखी एका तरुणानं सायकलसहीत वेगळी वाट धरत आपलं स्वप्न पूर्ण केलंय. पुणे ते कन्याकुमारी असं जवळपास 1500 किलोमीटरचं अंतर या तरुणानं अवघ्या 11 दिवसांत पूर्ण केलंय.
शुभांगी पालवे, मुंबई : पुण्याचा रहिवासी असलेल्या आणखी एका तरुणानं सायकलसहीत वेगळी वाट धरत आपलं स्वप्न पूर्ण केलंय. पुणे ते कन्याकुमारी असं जवळपास 1500 किलोमीटरचं अंतर या तरुणानं अवघ्या 11 दिवसांत पूर्ण केलंय.
तुषार देशमुख... वय 36 वर्ष... पुण्याच्या चतुश्रृंगी परिसरात तो राहतो. 26 जानेवारी रोजी त्यानं आपल्या स्वप्नवत प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली. पुणे - कराड - संकेश्वर - हरियाळ - कुमटा - कानमगड - ब्रह्मवर - कालिकत - कोलम - त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारी अशी दरमजल करत त्यानं जवळपास 1500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. या प्रवासात त्यानं हरियाळ, कालिकत, कोलम या ठिकाणी मुख्य रस्ता सोडून ऑफ रोडचाही वापर केला.
सकाळी 5.30 वाजता प्रवासाला सुरुवात करून सायंकाळी 6.30 पर्यंत पुढचा पल्ला गाठायचा, हा आपला शिरस्ता त्यानं संपूर्ण प्रवासभर कायम ठेवला. आपल्यासोबत थोडे कपडे, ड्रायफ्रूटस्, बेसिक मेडिसिन आणि एक स्लिपिंग बॅग घेऊन तो या प्रवासावर निघाला होता.
आत्मविश्वास तावून सुलाखून काढणारा हा प्रवास ठरला, अशी प्रतिक्रिया तुषारनं दिलीय. पुणे ते कन्याकुमारी या रोडवरून पहिल्यांदाच प्रवास करत असलो तरी प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं स्कील हाताशी असल्यानं छोट्या छोट्या गोष्टींची प्लानिंग करूनच घरातून बाहेर पडलो होतो... त्यामुळे फार अडचणी जाणवल्या नाहीत, असंही त्यानं म्हटलंय.
रिकामटेकडा आहे म्हणून नाही तर सायकलिंगची आवड त्याला या मार्गावर घेऊन आलीय. तुषारनं कम्प्युटर सायन्समध्ये आपलं मास्टर्स पूर्ण केलंय... आणि सध्या एका नामांकित आयटी कंपनीत तो काम करतोय. आत्मविश्वास असेल तर आयुष्यात कुठलाही कठिण प्रसंग तरी त्याला यशस्वीपणे तोंड देता येऊ शकतं, असं तुषारनं म्हटलंय.
याआधीही, आपल्या मित्रांसहीत तुषारनं कुल्लू ते खारदुंग ला हा प्रवास दोन वेळा सायकलवर केलाय... तर श्रीलंकाही जवळपास 1300 किलोमीटरचा प्रवास करत पायाखाली घातलीय.