नाशिक: विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली. मात्र शिवसेना उमेदवारांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या भाजपा बंडखोरांवर मात्र अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपने युतीच्या धर्माचं पालन करावं असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमसरचे बंडखोर उमेदवार चरण वाघमारे, मीरा भाईंदरच्या गीता जैन, चिंचवडमधून बंडखोरी केलेले बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूरच्या अहमदपूरचे दिलीप देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ केले. तर बंडखोरी केलेले पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी आपणहून राजीनामा दिला. 


मात्र, शिवसेना उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपाचा हाच युतीधर्म आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. 


भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी संजय राऊत यांची भेट घेतली. नाशिक पूर्व मतदारसंघात बाळासाहेब सानप विरुद्ध राहुल ढिकले समोरासमोर उभे ठाकल्याने मुंडे वंजारी विरुद्ध मराठा समाजात वाद पेटला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील वंजारी समाजाची मते सांभाळण्याचा प्रयत्न शिवसेनेतर्फे करण्यात आल्याची चर्चा आहे.