`निष्ठावंतांना विचारल्याशिवाय काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुनर्प्रवेश नाही`
पक्षाला सोडून गेल्यानंतर अनेक जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले.
नाशिक: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या अनेकांना पक्षात परतायचे आहे. मात्र, यासंदर्भात निष्ठावंतांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी काँग्रेस नेत्यांच्या घरवापसीसंदर्भात भाष्य केले. पक्ष सोडून गेलेले नेते आता अत्यंत अस्वस्थ आहे. आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात आहे. मात्र, यापैकी काही नेते वारे फिरेल तसे फिरणारे आहेत. त्यामुळे या नेत्यांना पक्षात घेण्याची घाई करणार नाही. पक्षाला सोडून गेल्यानंतर अनेक जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय गयारामांना पुन्हा प्रवेश देणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात यांनी कालच भाजपला यासंदर्भात इशाराही दिला होता. समुद्राला जितकी मोठी भरती येते तेवढीच मोठी ओहोटीही येते. हा निसर्गाचा नियम आहे. भाजपमध्ये या ओहोटीची सुरुवात झाली आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते. मात्र, भाजप आमदार आशिष शेलार यांनी दावा फेटाळून लावला होता. भाजपमध्ये आधीपासून असलेले किंवा नव्याने आलेले आमदार पक्षाची शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. महाविकासआघाडीने आपल्या आमदारांना मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र, आता प्रत्यक्षात काहीच घडत नाही. ही परिस्थिती पाहून आमच्याकडे आलेले आमदार 'बरे झाले आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला', असे म्हणत असल्याचा दावा शेलार यांनी केला होता.