जळगाव: रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपच्याच लोकांनी पाडल्याचा आरोप करणाऱ्या एकनाथ खडसे यांना माजी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, असे थेट आव्हानही महाजन यांनी दिले. ते शुक्रवारी जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, कुणीही कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे यापूर्वी अवघ्या १२०० आणि ८५०० हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे फरक पडला. तसेच याठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रही आले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल


काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी पक्षनेतृत्वावर तोफ डागली होती. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातंर्गत विरोधकांमुळे झाला. या सगळ्यांची नावे मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहेत. आता या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मी ही गोष्ट स्वत: वरिष्ठांच्या कानावर घातली. मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. गेल्या काही काळात जे काही घडले त्यामुळे पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत. याबद्दल मी वरिष्ठांना कळवल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. 


तसेच पक्षनेतृत्त्वाने अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे. यश माझ्यामुळे आणि अपयश दुसऱ्यामुळे हे धोरण साफ चुकीचे आहे, असा टोलाही खडसेंनी लगावला होता. याशिवाय, भाजपमध्ये ओबीसींना डावलले जात असल्याची कबुलीही खडसे यांनी दिली होती. मात्र, महाजन यांनी हा आरोपही फेटाळून लावला. भाजपमधील सर्वात महत्त्वाची पदे ओबीसींकडे आहेत. मी स्वत: ओबीसी आहे. भाजपचे आमदार पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा कपोकल्पित असल्याचे महाजन यांनी सांगितले.