`नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा`, राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, `मी 14 तारखेला..`
Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: पत्रकारांशी नाशिकमध्ये संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेंकडे ज्या नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी होती त्या विभागामध्ये 800 ते 900 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत आत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्येच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
राऊत स्वत: करणार गौप्यस्फोट
नाशिकमधील कथित घोटाळ्यासंदर्भात राऊत यांनी यापूर्वी केलेल्या आरोपाच्या संदर्भातून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा महानगरपालिकेमध्ये नगरविकास विभागाच्या माध्यमातून झालेला आहे. 14 तारखेला मी कागदपत्रांसहीत मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल खुलासा करीन. पुन्हा 15 तारखेला नाशिकला येत आहे. तेव्हा मी आपल्याला ती कागदपत्रं देईन," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना, "एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेत जनतेचा 850 ते 800 कोटींचा पैसा कसा लुटला, ठराविक बिल्डांची चांदी कशी केली याचे पुरावे मी त्यावेळेस देईन," असं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्याकडे कोण लक्ष देतं?
"नाशिक महापालिकेची वाट लावली. त्यामध्ये जे प्रमुख लोक होते त्यात या भ्रष्टाचाराचे सूत्रधार होते ते नगरविकास खात्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे होते. आजही ती लूट सुरु आहे," असंही राऊत यांनी म्हटलं. तसेच राऊत यांना संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारांना लीड मिळवण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यावरुन प्रश्न विचारला असता, "त्यांच्या इशाऱ्याकडे कोण लक्ष देतं" असं म्हणत संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे या मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी असतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> 'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
..म्हणून मोदींच्या राज्यात एवढ्या सभा
'मोदी राज्यात 27 सभा घेत असून 7 सभा मुंबईत घेत आहेत,' असंही राऊत यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. पुढे बोलताना, "मुंबईत मोदी 7 ते 8 सभा घेत आहेत. त्याचं कारण म्हणजे नकली शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही. अजित पवारांच्या नकली राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना काही फायदा होत नाही," असं राऊत म्हणाले.