नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका सातत्याने वाढत आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील नागरिक सध्या हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. येथील निफाड तालुक्यात दरवर्षी राज्यातील इतर भागांच्या तुलनेत तापमानाचा पारा कमालीचा घसरतो. सोमवारी पहाटे याठिकाणी यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमान नोंदवण्यात आले. वेधशाळेच्या माहितीनुसार, निफाडमध्ये १.८ सेल्सिअस इतके तापमान आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे या परिसरातील तापमान घसरले आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर सातत्याने वाढत आहे. ही थंडी नाशिक परिसरातील गहू आणि हरभरा या पिकांना पोषक आहे. मात्र, तापमानाचा पारा आणखी खाली गेल्यास नाशिकमधील द्राक्ष उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच पुणे वेधशाळेने राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशाराही दिला होता. ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरनंतर थंडी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, उत्तर भारतातील थंड प्रवाह राज्यात येत असल्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थंडीचा कडाका पुन्हा वाढला होता. कधी नव्हे ते मुंबईतही कमालीची थंडी अनुभवायला मिळत आहे.



कारगिलमध्ये रक्त गोठवणारी थंडी, गुलमर्गमध्ये मायनस 10 डिग्री तापमान


भारताच्या अनेक भागांमध्येही थंडीचा असाच जोर आहे. लेहमध्ये गुरुवारी उणे १७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ११ वर्षांतील सर्वाधिक कमी तापमान रविवारी रात्री नोंदविण्यात आले. सोमवारी पहाटे उणे ६.८ अंश सेल्सियस इतके तापमान श्रीनगरमध्ये नोंदविण्यात आले. प्रसिद्ध दल लेक गोठले आहे. अमृतसर शहराचे तापमान सकाळी १.१ अंश सेल्सियस इतके होते, तर राजधानी दिल्लीमध्ये ४.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले.