नाशिकमधील भाजपचे सहा नगरसेवक गायब; महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत
माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या खेळीने भाजप अडचणीत
नाशिक: राज्यात शिवसेनेने आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यास त्याचा थेट परिणाम नाशिक महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. याठिकाणी महाशिवआघाडीचा महापौर निवडून आणण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांनी पाठिंबा दिला तर संख्याबळ ५५ पर्यंत जाईल. बहुमतसाठी ६१ चा आकडा हवा असल्याने नगरसेवकांच्या फोडाफोडी सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सहा नगरसेवक गायब असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
त्यामुळे आपल्या उर्वरित नगरसेवकांना सहलीला पाठवण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. राज्यात सत्ता स्थापन करताना भाजप वगळून सर्व पक्षांना आपले आमदार सुरक्षित स्थळी नेले होते. मात्र, आता नगरसेवकांना हलवण्याची वेळ खुद्द भाजपवर आलीय. गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचा-भाजपशी असलेला संसार मोडून सेनेने आघाडीच्या पक्षांशी मिळवलेला सूर आता राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत अडचणीचा ठरणार आहे.
'मुंबई- ठाण्यात महापौर शिवसेनेचाच'
नाशिकमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापल्याने सानप यांनी भाजपला अडचणीत आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यांच्या गटातील सहा नगरसेवक ऐनवेळी महाशिवआघाडीला समर्थन देऊ शकतात. हे सर्व नगरसेवक सहलीला गैरहजर आहेत.
सध्याच्या महापौर रंजना भानसी या सुद्धा बाळासाहेब सानप गटाच्या ओळखल्या जातात. सहलीला जाताना त्यांची उपस्थिती दिसली असली तरी काही वेळाने पुढे जाऊन त्यांनी आपल्या गाडीचा रस्ता धरला. त्यामुळे भाजपत सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, तरीही महापौर भाजपचाच असेल असा दावा महापौरांनी केला. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आता महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुकांमध्ये रंगताना दिसतोय. त्यामुळे नाशिकच्या महापौर पदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.
नाशिक महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ
भाजप - ६५
शिवसेना ३४
काँग्रेस ६
राष्ट्रवादी ६
मनसे ५
इतर ४