Sania Mirza Father Reacts On Daughter Divorce Shoaib Malik 3rd Marriage: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू शोएब मलिकने 20 जानेवारी रोजी  पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरा निकाह केला. कराचीत पार पडलेल्या या विवाहमुळे भारतीय टेनिसपटू सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. शोएबने सानियाबरोबर लग्न केलं होतं. या दोघांनाही एक मुलगा आहे. मात्र शोएबनं घटस्फोट घेऊन तिसरं लग्न केल्याचं सोशल मीडियावर फोटो शेअर करत जगजाहीर केलं. शोएब आणि सानियाचा 5 वर्षांचा मुलगा अझान हा सानियाबरोबरच राहतो. या घटस्फोटानंतर सानियाचे वडिलांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


नात्याला पूर्णविराम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराचीमध्ये झालेल्या शोएबच्या तिसऱ्या  लग्नात त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता, असं 'द पाकिस्तान डेली'ने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. तसेच या वृत्तानुसार, सानिया मिर्झाला शोएब मलिकच्या कथित विवाहबाह्य संबंधांबद्दल समजलं होतं. अनेकदा समजावूनही शोएबकडून हे असले प्रकार होत होते. त्यामुळे सानिया या साऱ्या प्रकाराला कंटाळली होती. तर हा खुलासा शोएब मलिकच्या बहिणीच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. शोएब आणि सानिया हे दोघं गेल्या अनेक महिन्यांपासून वेगळे राहत होते, अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता शोएबच्या तिसऱ्या लग्नाने सानिया आणि शोएबच्या नात्याला पूर्णविराम लागला आहे.


वडिलांची पहिली प्रतिक्रिया


असं असतानाच आता सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा घटस्फोट सानियानेच घेतल्याचं म्हटलं आहे. 'ते दोघेही 'खुला' पद्धतीने विभक्त झाले आहेत,' असं इम्रान मिर्झा यांनी पीटीआयला सांगितलं. जेव्हा मुस्लीम महिला पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत त्याला घटस्फोट देते त्याला 'खुला' असं म्हणतात. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये वाद सुरु होता. दोघांनी इन्स्टाग्रामवरही एकमेकांना अनफॉलो केलं होतं. दोघांनी एकमेकांबरोबरचे सर्व फोटोही डिलीट केले होते.


 'खुला' म्हणजे नेमकं काय?


'खुला' हा घटस्फोटाचाच प्रकार आहे. यामध्ये इतकाच फरक असतो की हा घटस्फोट महिलेकडून दिला जातो. 'खुला'च्या माध्यमातून मुस्लीम महिला तिच्या नवऱ्यासोबतचे सगळे संबंध तोडू शकते. घटस्फोटात पुरुष पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतो, तर 'खुला'मध्ये महिला तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते. 'खुला'साठी पती आणि पत्नी दोघांचाही होकार असणं गरजेचं असते. ज्या महिला त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नाहीत त्या महिला 'खुला'मधून विभक्त होतात.


13 वर्ष टीकलं दोघांचं नातं


शोएब आणि सानिया मिर्झा यांचा निकाह हैदराबादमध्ये झाला होता. एप्रिल 2010 मध्ये सानियाच्या वडिलांचं घर असलेल्या भारतातील हैदराबाद शहरात या दोघांचा विवाह झाला होता. या दोघांना 2019 साली पुत्ररत्न प्राप्ती झाली.