`Pizza चा खापर खापर पणजोबा` साडला! उत्खननातून समोर आली इटालियन पिझ्झाची 2000 वर्षांपूर्वीची रेसिपी
पिझ्झा प्रत्येकानं स्वत:ला हवा त्या पद्धतीनं तयार करत त्याचा आस्वाद घेतला. हा पदार्थ खातना कधीतरी प्रश्न मनात आला, की हा पिझ्झा नेमका सुरु तरी कुठे झाला?
आम्हीच पिझ्झाला लोकप्रियता दिली, असा दावा ठोकणारे अनेकजण तुम्हीआम्ही पाहिले असतील. पण, आता मात्र तो नेमका कुठून आला यावरून पडदा उचलला गेला आहे.
पुरातन रोमन संस्कृतीची झलक आणि वारसा असणाऱ्या पोम्पेई शहरातून एक अद्वितीय असं चित्र पुरातत्वं विभागाच्या हाती लागलं आहे.
साधारण 2000 वर्षांपूर्वीच्या या चित्रामध्ये दिसणारा फ्लॅटब्रेड आणि त्यावर दिसणारे पदार्थ पाहता हा तत्कालीन इटालियन पिझ्झाच असल्याचा कयास लावला जात आहे.
उत्खननातून समोर आलेल्या या कलाविष्कारामध्ये एका चांदीच्या थाळीमध्ये एक फ्लॅट ब्रेड (पिझ्झा बेस किंवा तत्सम पदार्थ), सुकामेवा, डाळींब आणि एका पात्रात रेड वाईन दिसत आहे.
'हा फ्लॅटब्रेड बहुधा सध्याच्या मॉडर्न पिझ्झाचा पूर्वज असावा', अशी प्रतिक्रिया इटलीच्या सांस्कृतिक मंत्रालयानं दिली.
संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या Naples या शहरापासून पोम्पेई शहर अवघ्या 23 किमी अंतरावर आहे.
तेव्हा आता हे चित्र पाहता त्यात दिसणारा कथित पिझ्झा खऱ्या अर्थानं सध्याच्या आधुनिक पिझ्झाचा नात्यात खापर खापर किंवा त्याहूनही वयस्कर पणजोबा लागत असावा, असंच म्हटलं जातंय. कमालच नाही का? (सर्व छायाचित्रे- http://pompeiisites.org)