Asia Cup 2023 : कधी, कुठे आणि किती वाजता पाहाता येणार एशिया कपचे सामने, जाणून घ्या सर्व काही
एशिया कप स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले असून अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. 30 ऑगस्टला यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर भारताचं मिशन एशिया कप 2 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
एशिया कप स्पर्धेतील सर्वात चुरशीचा समजला जाणारा भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 2 सप्टेंबरला रंगणार आहे. श्रीलंकेतल्या कँडी इथं हा सामना खेळवला जाणार आहे. तर भारताचा लीगमधला दुसरा सामना 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणार आहे. सहा संघांमध्ये दोन ग्रुप करण्यात आले असून ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ आहेत.
एशिया कप स्पर्धेची फायनल 17 सप्टेंबरला श्रीलंकेतल्या कँडी इथं होणार आहे. गेल्या वेळी एशिया कप स्पर्धेचं आयोजन टी20 फॉर्मेटमध्ये करण्यात आलं होतं. पण यावेळी 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ग्रुप स्टेनंतर सुपर -4 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर-4चे सामने 6, 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबरला खेळवले जाणार आहेत.
एशिया कप 2023 स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहेत. स्टार स्पोर्टस नेटवर्कवर याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे. तर सामन्याचे डिजिटल हक्क डिज्नी प्लस हॉटस्टारकडे आहेत. याशिवाय भारतीय संघाचे सामने डीडी स्पोर्टसवरही पाहाता येणार आहेत.
पाकिस्तान आणि श्रीलंकेत येत्या 30 ऑगस्टपासून 17 सप्टेंबरपर्यंत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार असून यातले चार पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
30 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने एशिया कप स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर 31 ऑगस्टरोजी कँडीत बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका, 2 सप्टेंबरला कँडीत भारत विरुद्ध पाकिस्तान, 3 सप्टेंबरला बांग्लादेश वि. अफगाणिस्तान, 4 सप्टेंबरला भारत वि. नेपाळ आणि 5 सप्टेंबरला श्रीलंका वि. अफगाणस्तान सामने रंगणार आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा