`मी रोज पहाटे 3.30 ला उठतो, दर सोमवारी उपवास करतो आणि...`; चंद्रचूड यांच्या फिटनेसचं रहस्य

Swapnil Ghangale Thu, 21 Mar 2024-1:02 pm,

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सध्या वेगवेगळ्या निकालांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. असं असतानाच आता देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या चंद्रचूड यांचा दिनक्रम समोर आला आहे.

धनंजय चंद्रचूड यांनी आपला दिनक्रम 'एनडीटीव्ही'शी बोलतान सांगितला. पहाटे साडेतीन वाजता चंद्रचूड यांचा दिवस सुरु होतो. पहाटे साडेतीन वाजता वातावरण फार शांत असतं त्यामुळे त्यावेळेस चिंतन करता येतं असं चंद्रचूड म्हणाले. 

मागील 25 वर्षांपासून आपण सातत्याने योग अभ्यास करत आहोत, असंही 65 वर्षीय चंद्रचूड म्हणाले. तसेच आपण आयुर्वेदानुसार डाएट करतो असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं.

 

"माझा दिवस साडेतीन वाजता सुरु होतो. त्यावेळेस वातावरण शांत असतं. तेव्हा मला चिंतन करता येतं. मी मागील 25 वर्षांपासून योग अभ्यास करत आहे. माझी पत्नी माझी फार चांगली मैत्रीण आहे. आम्ही दोघेही व्हेगन असल्याने आम्ही आयुर्वेदिक आहारपद्धतीचं जेवण करतो. आमची लाइफस्टाइलही वनस्पतीजन्य पदार्थांवर अवलंबून आहे," असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

 

आपण जे काही खातो त्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो, असं माझं मत आहे असेही चंद्रचूड यांनी सांगितलं. फिटनेस ही तुम्हाला स्वत:ला जाणवली पाहिजे. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये, मेंदूत आणि अगदी हृदयापासून फिटनेस जाणवली पाहिजे. असा विचार केला तर तुम्ही जेवढा विचार करणार तेवढे फिट राहणार, असं सरन्यायाधीश म्हणाले.

 

'मी साबुदाणा खात नाही. मी रामदाना खातो. मागील 25 वर्षांपासून मी दर सोमवारी उपवास ठेवतो. महाराष्ट्रामध्ये रामदाना मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मराठीत याला लाह्या म्हणतात. या पचनाला फार हलक्या असतात. मात्र सर्वात पौष्टीक असतात,' असं चंद्रचूड म्हणाले.

कोणत्याही डाइट करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे माझाही चीट डे असतो असंही सरन्यायाधीशांनी आवर्जून सांगितलं. या दिवशी मला आईस्क्रीम खायला आवडतं. मात्र अशा दिवशी आपला मेंदू आपल्या ताब्यात ठेवणं गरजेचं असतं. असं केलं तरी तुमचे अर्ध्याहून अधिक त्रास कमी होतात, असं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं.

 

"माझं आयुष्यही इतरांप्रमाणे चढ उतार असलेलं आहे. मी सुद्धा जीवनातील प्रत्येक पैलू पाहिला आहे. मात्र आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात उमेद कायम ठेवली पाहिजे. कोणीही समस्या असो तुम्ही त्यावर विजय मिळवला पाहिजे. प्रत्येक संकट काहीतरी कारणासाठी येतं, असं चंद्रचूड म्हणाले.

संकटामागील कारण आपण समजून घेतलं पाहिजे. मात्र तुम्हाला या संकटामागील कारणाबद्दल त्यावेळी कळत नाही. त्यामागील कारण तुम्हाला काही दिवसांनी समजतं," असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link