48 नाही `हे` 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार `निकाल`

Swapnil Ghangale Thu, 16 May 2024-2:59 pm,

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील 48 पैकी 13 मतदारसंघांत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होणार आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये 2 मतदारसंघांमध्ये थेट लढत होणार आहे.

म्हणजेच राज्यातील एकूण 15 मतदारसंघांमधील जनाधार कोणाच्या बाजूने असेल यावर खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोण हे ठरेल असं म्हणता येईल. या 15 मतदारसंघांमध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत जनमताचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे पहाणं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरणार आहे. हे 15 मतदारसंघ कोणते ते पाहूयात..

महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेमध्ये 2 वर्षांपूर्वी उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह दिलं.

शिवसेनेबरोबर जे घडलं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील जनतेनं 2023 च्या मध्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाहिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठ्या गटाने स्वपक्षाविरुद्ध बंड करत सरकारमध्ये स्थापन होण्याचा निर्णय घेतला. 

निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी जो निर्णय शिवसेनेसंदर्भात दिलेला तसाच निर्णय राष्ट्रवादीसंदर्भात देत अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह दिलं.

या नाट्यमय घडामोडींनंतरची लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पहिलीच मोठी निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे राज्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत.

एका शिवसेनेचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत सहभागी होऊन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे करत आहेत. तर दुसऱ्याचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे.

राष्ट्रवादीचीही अशीच अवस्था असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एक आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दुसरी राष्ट्रवादी असे परस्पर दोन विरोधी गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांची महायुती विरुद्ध भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट या महायुतीचा थेट सामना होत आहे.

 

यापैकी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट या दोन्ही शिवसेना पक्षांमध्ये कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, शिर्डी, हातकणंगले, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद, यवतमाळ-वाशिम आणि बुलढाणा या 13 मतदारसंघांमध्ये थेट लढत होत आहे.

तर दुसरीकडे महायुतीमधील जागावाटपात अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या असून त्यापैकी दोन जागांवर त्यांचा सामना शरद पवार गटाशी होणार आहे. रायगड आणि धाराशिवमध्ये अजित पवार गट ठाकरे गटाविरुद्ध लढणार आहे.

 

पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि बारामती या दोन मतदारसंघांमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी राष्ट्रवादीमध्येच निवडणुकीच्या रिंगणात लढाई होत आहे.

 

महाविकास आघाडीतील जागावाटपात 10 जागा लढवणारा शरद पवार गट हा बीड, म्हाडा, रावेर, दिंडोरी, सातारा, वर्धा, नगर, भिवंडी या आठ मतदारसंघांमध्ये भाजपाविरुद्ध लढणार आहे.

तसेच ठाकरे गट पालघर, सांगली, ईशान्य मुंबई, जळगाव, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहे.

 

पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भाजपा आणि काँग्रेस राज्यातील 48 पैकी 15 मतदारसंघांमध्ये थेट आमने-सामने आहेत. 

 

त्यामुळे आता ठाकरे विरुद्ध शिंदे आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार गट या लढतींमधील 15 मतदारसंघांमध्ये जनतेला कौल कोणाच्या बाजूने पडतो आणि कोण खरी शिवसेना तसेच खरी राष्ट्रवादी ठरते हे 4 जूनलाच स्पष्ट होईल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link