लोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा

Sun, 19 May 2024-6:05 am,

मयुर निकम , झी २४ तास , बुलढाणा:  उल्कापाताने तयार झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे आपण लोणारला ओळखतो. पण सरोवराच्या परिसरात इतरही पौराणिक वास्तु आणि मंदिर बांधलेली आहेत. 

त्यापैकी आपण दैत्यसूदन मंदिर पाहिलंय का? तर हो हे दैत्यसूदन मंदिर देखील या लोणार नगरीची मोठी ओळख आहे. आणि गेल्या दोन दिवसांत तर चक्क सूर्याने या मंदिराला प्रकाशात आणले.. ते कसे पाहूया...

स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. 

भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30  या वेळेपुरतीच मर्यादित आहे. 

तसेच 19 मे पर्यंतच हा अद्भुत नजराणा दिसणार आहे. यामुळे या मंदिरात सध्या पर्यटक आणि अभ्यासक यांची मोठी गर्दी उसळत आहे.

क्रॉप पेपरला घड्या घालून जसे दिसते, तशा स्वरूपाचे दगडाला घड्या घालून तयार झालेले हे दैत्यसुदन मंदिर लोणार मधील एक अद्भुत अशी शिल्पकला आहे. 

दैत्यसूदन मंदिर हे नवव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्यशैलीतील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते. 

कोणार्कचे सूर्य मंदिर आणि खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्यशैलीच्या आधारावरती या मंदिराची रचना असून भगवान विष्णूंना समर्पित केलेल्या या मंदिरात भगवान विष्णूंची मूर्ती आहे.

मंदिराला बाहेरून इतके कोरीव काम आहे की, एक एक पॅनेल निरखून बघायला पूर्ण दिवस लागू शकतो. या मंदिराच्या सगळ्याच बाजूने अतिक्रमण झाले असल्याने आता तिथला रस्ता अरुंद झाला आहे. 

बरेच लोक फक्त सरोवर बघून आणि लोणार धार येथील मंदिर बघून निघून जातात, पण सरोवराच्या खाली ठीकठिकाणी शेकडो वर्षांपासूनची जुनी मंदिर आहेत. त्यापैकीच एक आहे हे दैत्यसूदन मंदिर. 

पूर्वीच्या काळी कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री नसताना देखील  स्थापत्य कलेचा हा अद्भुत नमुना आजही दिमाखात उभा आहे आणि थेट सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून तर थेट पायापर्यंत अभिषेक घालतात हे अद्भुतच...!

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link