Housing Tips: घर खरेदी करताना या 10 गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष; बसू शकतो मोठा फटका

Tue, 14 Mar 2023-2:42 pm,

1) जाहिरात पाहून निर्णय घेऊ नका- अनेक बिल्डर आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून घरविक्रीचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्यक्षात लोकेशनवर जाऊन आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेतल्यानंतरच घरखरेदीसंदर्भातील अंतिम निर्णय घ्यावा.

2) बिल्डर ऑफर - बिल्डरकडून अनेकदा काही विशेष ऑफर दिल्या जातात. मात्र बिल्डरकडून ऑफर दिली जात असेल तर नेमकी किती सूट दिली जात आहे, या ऑफरचा नक्की काही फायदा होणार आहे का, बेरीज-वजाबाकी करुन नेमका फायदा होणार आहे का? यासारख्या गोष्टी पडताळून पहाव्यात.

3) कमी बजेटच्या नादात सुविधांकडे दुर्लक्ष - अनेकदा कमी बजेटमध्ये घर घेण्याच्या नादात लोक मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करतात. प्रोजेक्ट लोकेशनपासून बिल्डरकडून नेमक्या कोणत्या आणि किती सुविधा दिल्या जात आहेत हे तपासून पहावेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक सेवा या मर्यादित कालावधीसाठी बिल्डरकडे असतात नंतर त्या सोसायटीच्या ताब्यात दिल्या जातात. याबद्दलही सविस्तर माहिती घ्यावी.

4) या तीन गोष्टी हव्याच - नव्या घरामध्ये पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि गॅसपुरवठासारख्या गोष्टी आवश्यक आहेत. यापैकी पाणीपुरवठा हा संबंधित स्थानिक प्रशासकीय संस्थेकडे (नगरपालिका, महानगरपालिका वगैरेकडून) दिला जणार की बोअरिंगचं पाणी दिलं जाणार हे विचारुन घ्यावे. तसेच वीजपुरवठ्यासंदर्भातील मीटर नावावर करुन घेण्यासारख्या गोष्टींबद्दलही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे अनेक बिल्डर हल्ली पाईप गॅसचे कनेक्शन संबंधित सेवा पुरवणाऱ्यांच्या माध्यमातून देतात. त्यासंदर्भातील कागदोपत्री पुर्तता कधी आणि कशी करावी लागणार हे ही तपासून घ्यावे.

5) एजंटचे दावे तपासून घ्या - घर खरेदी करताना बिल्डर, एजंट किंवा चॅनेल पार्टनर म्हणून मदत करणाऱ्या व्यक्तींचं म्हणण्यावर थेट विश्वास ठेऊ नका. स्वत: त्या प्रकल्पासंदर्भातील सविस्तर माहिती आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा करा. बिल्डर, एजंट आणि चॅनेल पार्टनरवर थेट विश्वास ठेवल्यास नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

6) जमिनीबद्दलची माहिती - जमिनीसंदर्भातील सविस्तर तपशील बिल्डरकडून जाणून घ्या. या जमीनीवर काही कायदेशीर खटले सुरु आहेत का, जमीन नेमकी कोणाच्या नावे आहे. जमीनीचं टायटल क्लियर आहे का म्हणजेच जमीनीवर हा प्रकल्प उभारण्यास परवानगी आहे का हे तपासून पाहा. संबंधित प्रकल्पाचा रेरा क्रमांक रेराच्या वेबसाईटवर टाकून त्या प्रकल्पासंदर्भातील कायदेशीर माहिती, खटले याबद्दलची मिळवता येते.

7) कागदपत्रं तपासून घ्या - घराचा व्यवहार करताना या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रं मिळाल्यानंतर कायदेशीर आणि प्रॉपर्टीसंदर्भातील ज्ञान असणाऱ्या जाणकारांकडून त्याची पडताळणी करुन घ्या. अनेकदा घराच्या खरेदी-विक्री करारामधील काही गोष्टी सर्वसामान्य ग्राहकांना कळत नाहीत. अशा गोष्टी हे तज्ज्ञ नीट समजावून सांगू शकतात.

8) बजेट किती? - भविष्यात तुम्हाला इतर कोणकोणती कामं करायची आहेत. भविष्यातील आर्थिक नियोजनाचा विचार करुनच बजेट निश्चित करा. केवळ लोन मिळत आहे म्हणून संपूर्ण क्षमतेइतकं लोन घेतलं तरी ते नंतर फेडावं लागतं हे लक्षात ठेवा. लोन कॅपेबिलिटीइतकं पूर्ण लोन घेण्याऐवजी जितकं ओन सोर्सिंग म्हणजेच स्वत: पैसे जितके अरेंज करु शकता तितकं कमी लोन घ्यावं लागतं.

9) शेजारी कसे - सामान्यपणे रिसेलमध्ये घर घेताना शेजारी कोण आहेत, ते कसे आहेत याबद्दलची माहिती जाणून घ्या. कारण नंतर शेजाऱ्यांशी छोट्या मोठ्या गोष्टींवरुन खटके उडाल्याचे प्रकार मनस्ताप वाढवणारे ठरु शकतात. नव्या प्रकल्पांमध्ये अशी शेजाऱ्यांसंदर्भातील चौकशी करण्याची संधी फारच कमी असते. 

10) बार्गेनिंग करा - घरासारख्या मोठ्या खरेदीमध्येही दरांबद्दल योग्य पद्धतीने चर्चा केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. अनेकदा अंतिम निर्णय घेण्याआधी बिल्डरबरोबर चर्चा करुन घराची सांगितलेली किंमत कमी करुन घेता येते. अर्थात सौदा निश्चित करण्याआधीच दर निश्चित करुन घ्यावा कारण या दराच्या आधारावरच स्टॅम ड्युटी आणि रजिस्ट्रेनशची रक्कम ठरते. घर खरेदी करताना आपलं बजेट आणि बिल्डरने सांगितलेली किंमत यामधील तफावत कमी करण्याची संधी असते. फक्त बार्गेनिंग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बार्गेनिंग केल्यास नक्कीच लाखो रुपयांचा फायदा होतो.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link