पुणे: सध्या भाजपमध्ये सुरु असलेल्या 'मेगाभरती'वरून शरद पवार आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'ईडी'च्या चौकशीचा धाक दाखवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप नुकतचा शरद पवार यांनी केला होता. या आरोपाला शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे यांना पक्षातून फोडताना 'ईडी'चा वापर करण्यात आला होता का, असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटलांनी पवारांना विचारला. 


राष्ट्रवादीतून फक्त तीन नेते बाहेर पडले तर शरद पवारांनी इतका धसका घेतला आहे. अजून बरेच लोक भाजपमध्ये येणार आहेत. आमचे लक्ष्य केवळ राष्ट्रवादी नाही. पुढील टप्प्यात काँग्रेसचेही काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 


गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते विरोधी गोटात दाखल झाले आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याचे कारण प्रत्येकजण देत असला तरी यामागे चौकशीची ससेमिरा कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. 


या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागल्याचे सांगत आता मेगाभरती होणार नाही, असे नुकतेच म्हटले होते. याविषयी चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, हाऊसफुलचा बोर्ड लागला असला तरी, थिएटरवाला काही तिकीटे शिल्लक ठेवतो.



यावेळी पत्रकारांनी पाटील यांना पक्षाने सांगितले तर मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्नही विचारला. त्याला उत्तर देताना पाटील यांनी, मी कशासाठीही इच्छूक नाही. परंतु, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडीन, असे त्यांनी सांगितले.