पुणे: पक्षाच्या चौकटीबाहेरच्या वक्तव्यांमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उमेदवारी अडचणीत आल्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले. त्यांनी बुधवारी 'झी २४ तास'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांविषयी काही अंदाज वर्तवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुडमधून विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. तसेच राज्यात महायुतीचे २४० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. यावेळी काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, अजित पवारांचे नाराजीनाट्य ही केवळ नौटंकी होती. मात्र, राष्ट्रवादीला २० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा काकडे यांनी केला. 


यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या उमेदवारविषयीही विचारण्यात आले. भाजपच्या १२५ उमेदवारांच्या यादीत खडसे यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, पक्षाने त्यांचे तिकीट कापल्यास काय होणार, याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. खडसे यांनी पक्षाची चौकट ओलांडून केलेल्या वक्तव्यांमुळे ही वेळ ओढावल्याचे काकडे यांनी सांगितले. 


जमीन गैरव्यवहारप्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतरही एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे खडसे यांनी ही खदखद अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. परखड स्वभावामुळे ते अनेकदा पक्षाला घरचा आहेर द्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. याशिवाय, भाजप नेतृत्त्वाकडून खडसे यांना दूर सारण्यात आल्याची शक्यता आहे. 


दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मात्र मुक्ताईनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाच्या दुसऱ्या यादीत आपले नाव नक्की येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.