पाच किलोची सोन्याची बिस्कीटे केली खरेदी, पैसे न देताच महिलेचा पोबारा; पोलिसांनी अशी केली अटक
पोलिसांनी महिलेला खारघर येथून 12 तासांच्या आत अटक केली आहे
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (पुणे) रविवार पेठेतून सराफी पेढीतून पाच किलोची सोन्याची बिस्कीटे लांबविणाऱ्या महिलेला पोलिसांनी नवी मुंबईमधून अटक केली आहे. सराफी दुकानात सोने खरेदीसाठी जाऊन गाडीत ठेवलेले पैसे आणून देण्याचा बहाण्याने पाच किलो सोन्याची बिस्किटे घेऊन एका सराईत महिलेने पोबारा केला होता. यानंतर फरासखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत दोन कोटी साठ लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेड्या (Woman arrested) ठोकत ऐवज जप्त केला.
माधवी सूरज चव्हाण (32, रा. खारघर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोपटलाल गोल्डचे राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. संशयीत आरोपी महिला ही मुळची खारघरची असून तिचे माहेर पुण्यातच आहे. पुण्यातून सोने घेऊन ते पुढे जास्त किंमतीला देण्याचे काम ती करत करत होती.
बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माधवी रविवार पेठेतील पोपटलाल गोल्ड या दुकानात आली होती. नेहमी किलो, अर्धा किलो अशा वजनाचे सोने ती खरेदी करत असे. बुधवारी तिने प्रेगनंट असल्याचे, वारंवार येण्यास जमणार नसल्याचे कारण देत तब्बल 5 किलो सोन्याची बिस्कीटे खरेदी केली. तिने काही रक्कम कॅश आणि काही रक्कम आरटीजीएस करणार असल्याचे सांगितले.
सोन्याची बिस्कीटे खरेदी केल्यानंतर गाडीत ठेवलेली कॅश घेऊन येण्याच्या बहाण्याने ती दुकानाच्या बाहेर पडली. दुकानदाराने देखील तिच्या मागे एक व्यक्ती पाठवला. परंतु, तिथे तिने कर्मचार्याला हुलकावणी देऊन पोबारा केला.
त्यानंतर माधवीने तिचा मोबाईल फोनदेखील बंद केला. या प्रकरणी रात्री उशिरा फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून तिचा माग काढला. दुकानाचे सीसीटिव्ही फुटेज तपासून त्या आधारे तिचा माग काढला असता ती खारघर येथे पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
फरासखाना पोलिसांचे पथक तिच्या अटकेसाठी रवाना झाले. त्यानंतर माधवी चव्हाणला खारघर येथील राहत्या घरातून सकाळी पावणे नऊच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, वरिष्ठ निरीक्षक राजेद्र लांडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अटक करण्यात आलेली महिला हि सोन्याची बिस्कीटे घेऊन बाहेर पडल्यानंतर तिने एक रिक्षा करून वाकड गाठले. तेथून शेअर कारने ती खारघर येथे गेली. तिचे घर मूळ स्थानकापासून लांब असल्याने तेथूनही तिने रिक्षाने प्रवास केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.