राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवले
रुपाली चाकणकर यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.
पुणे : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. डेंग्यूच्या लक्षणांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुबी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवरुन दिली आहे.
रुपाली चाकणकर या जालना दौऱ्यावरुन आल्यावर त्यांची तब्येत बिघडली होती. प्लेटलेट्स कमी झाल्याचं बोललं जात होतं, मात्र आता डेंग्यूच्या लक्षणांमुळे त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईला मागे टाकून पुण्यात सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. आज पुण्यात 1812 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54,624 एवढी झाली आहे. यात 33,648 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19,517 एवढी आहे. आत्तापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 1,359 जणांचा मृत्यू झाला आहे.