`अभिजीत बॅनर्जींना नोबेल मिळाला असेल पण ते डाव्या विचारसरणीचे`
अभिजीत बॅनर्जींची समज कितपत आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.
पुणे: वैश्विक गरीबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर केलेल्या संशोधनासाठी अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झालेल्या अभिजीत बॅनर्जी यांच्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टीकास्त्र सोडले आहे. अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पारितोषिक मिळाले, हे ठीक आहे. पण ते डाव्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे त्यांची समज कितपत आहे, हे तुम्हा सर्वांनाच ठाऊक असल्याचे वक्तव्य पीयूष गोयल यांनी केले. ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजीत बॅनर्जी यांनी सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया डळमळीत झाल्याचे मत व्यक्त केले होते. याविषयी पीयूष गोयल यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा गोयल यांनी म्हटले की, अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पारितोषिक मिळाले, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, त्यांची समज कितपत आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांची विचारसरणी ही पूर्णपणे डावीकडे झुकलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसच्या 'न्याय' योजनेची भलामण केली होती. मात्र, भारताच्या जनतेने त्यांचा हा विचार सपशेल नाकारला होता, असे गोयल यांनी म्हटले.
नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांचं 'मुंबई' आणि 'मराठी' कनेक्शन...
लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात 'न्याय' (NYAY) योजनेचा समावेश होता. योजनेची रुपरेषा आखणाऱ्या तज्ज्ञांमध्ये अभिजीत बॅनर्जी यांचा समावेश होता. या योजनेनुसार देशातील ५ कोटी गरीब कुटुंबांना दर महिन्याला सहा हजार रुपये म्हणजेच वर्षाला ७२ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.
अभिजीत बॅनर्जी यांचे शिक्षण डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) झाले आहे. आपल्या जडणघडणीविषीय बोलताना अभिजीत बॅनर्जी यांनी जेएनयूचा उल्लेख केला होता. जेएनयूने मला भारतीय राजकारण काय असते, याची जवळून ओळख करून दिली. गांधीवादी, आरएसएसवादी आणि इतर सर्व प्रकारचे भारतीय राजकारणातील पैलू मला इथे पहायला मिळाले. तसेच या सर्व विचारांशी स्वतःला कसे जोडून घ्यायचे हे देखील मी इथे शिकलो. त्यामुळे जेएनयूने खऱ्या अर्थाने मला भारतीय राजकारणाची चांगली जाण दिली, असे त्यांनी म्हटले होते.