पुणे: पुणेकर काय करतील याचा नेम नाही.... पुण्यातल्या एका महिलेनं चक्क चंद्रावर जागा घेतली. मात्र अर्थातच त्यांची फसवणूक झालीय... आता चंद्राकडे नुसतंच बघण्याची वेळ त्यांच्यावर आलीय..... ऐकावं ते नवलच म्हणावं अशी ही  बातमी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोया खोया चांद... अशीच अवस्था पुण्यातल्या राधिका दाते यांची झालीय... त्यांच्या हातात आहे तो  पृथ्वीपासून हजारो मैल दूर असलेल्या चंद्रावर जागा खरेदी केल्याचा करारनामा... 


विकत घेतलेला भूखंड चंद्रावर नेमका कुठे आहे तेही या नकाशात दाखवलंय... इतकच नाही, तर भूखंडावरच्या खनिजांचे हक्क, चंद्रावरच्या वास्तव्याचे नियम आणि अटी अशा सगळ्या प्रकारची कागदपत्रं राधिका दाते यांच्याकडे आहेत. 
अमेरिकास्थित 'लुणार प्रॉपर्टीज' नावाच्या कंपनीनं त्यांना हे दस्तावेज घरपोच पाठवले आहेत. 


राधिका यांनी २००५ मध्ये चंद्रावर जागा विकत घेतली. ५० हजार रुपयांमध्ये त्या एक एकर जागेच्या मालक झाल्या आहेत. एखादं स्वप्न बघावं अशी ही  गोष्ट आहे. चंद्रावर जमीन खरेदी करता येत असल्याची माहिती राधिका यांना एका वाहिनीवरच्या कार्यक्रमातून मिळाली. चंद्राचा मोह राधिका यांना आवरता आला नाही. पुढे मात्र जे घडायचं होतं तेच घडलं...


राधिका यांची फसवणूक झाली होती. त्यांनी ज्यांना पैसे दिले होते ते केव्हाच बेपत्ता झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी काही वर्षांपूर्वी पोलिसांकडेदेखील संपर्क केला होता. मात्र या प्रकरणाचा तपास कसा करायचा याबद्दल पोलिसांनाही काही कळेना... आज राधिका दाते आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केलाय. खरंतर आपण स्वतःच्या गावात टीचभर जमीन घ्यायची असली तरी शंभर वेळा शाहनिशा करतो.... इथं तर थेट परग्रहावर जमीन खरेदी करण्यात आलीय... राधिका दातेंच्या उदाहरणावरुन धडा घ्या, आणि शाहणे व्हा... चंद्र स्वप्नात आणि कवितेतच बरा...