पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचे आगमन यंदा उशीरा झाले होते. मात्र, पुढच्या वर्षी 12 दिवस आधीच बाप्पाचे आगमन होणार आहे. जाणून घ्या तारीख आणि वेळ
Ganesh Chaturthi 2024: मंगळवारी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. तर, बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये गणेशचतुर्थी कधी आहे, हे जाणून घेऊया.
दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षात गणेशचतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवसांचे बाप्पा आणले जातात तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. बाप्पाच्या विसर्जनाच्या क्षणी प्रत्येक भक्त भावूक होत पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ बाप्पाला घालतो. यंदा अधिक मास आल्याने बाप्पाचे आगमनही उशीरा झाले. मात्र, पुढच्या वर्षी 12 दिवस आधी बाप्पाचे आगमन होणार आहे. जाणून घेऊया वार आणि तिथी.
बाप्पा पुढील वर्षी लवकर येणार आहे. यंदा श्रावण अधिक मासामुळं बाप्पांचे आगमन 19 दिवस उशीराने म्हणजेच 19 सप्टेंबर 2023ला झाले होते. तर यंदा गौरी-गणपतीचे विसर्जनही पाच दिवसांवर आहे. मात्र, पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन 10 दिवस आधी होणार आहे. शनिवारी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आहे. 2024मध्ये चतुर्थी 6 सप्टेंबर 2024 दुपारी3.1 वाजता सुरू होउन 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.37 वाजता संपणार आहे. मात्र उदया तिथी असल्याकारणाने 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येते. त्यामुळं बाप्पाचे आगमनही 7 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2024 मध्ये बाप्पा सहा दिवस असणार आहे. म्हणजेच गुरुवारी 12 सप्टेंबर 2024 रोजी सहाव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तर, अनंत चतुर्दशी यंदा 28 सप्टेंबर 2023 ला पुढील वर्षी मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी असेल. म्हणजेच अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशी असेल, असं सांगण्यात येतंय
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)