Adhik Maas Marathi Information: आजपासून म्हणजेच मंगळवार, 18 जुलैपासून अधिक श्रावणमासाला सुरुवात झाली आहे. अधिक श्रावणमास हा बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत असणार आहे. पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंड्याचा महिना अशीही उपनावे अधिकमासाला आहेत. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, 17 ॲागस्ट ते शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन , नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव- व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत असं जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. मग अधिकमासामध्ये नेमकं काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही दा. कृ. सोमण यांनी दिलं आहे.


अधिकमास म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळात अधिकमास म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आधी याबद्दल जाणून घेऊयात. पंचांगामध्ये चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र महिना असं म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख असं म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास समजला जातो, असं दा. कृ. सोमण सांगतात.


33 अंकाला विशेष महत्त्व का?


"अधिकमासात संपूर्ण दिवस उपवास किंवा एका वेळेचं भोजन करावे. देवापुढे अखंड दीप लावावा. 33 अपूप म्हणजे अनरसे दान करावे. 33 अनरसे भगवान विष्णूला अर्पण करावेत असे सांगितले आहे. मात्र जावई हा विष्णूसमान मानला जातो. म्हणून अधिकमासात जावयाला 33 अनरशांचे दान देण्याची प्रथा सुरू झाली असावी. इथे 33 अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन वर्षात वाढल्या गेलेल्या तेहतीस तिथी मानल्या जातात," असं दा. कृ. सोमण सांगतात.


अधिकमासात काय करावे?


"अधिकमासात नित्य व नैमत्तिक कर्मे करावी. मात्र काम्य कर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. केल्यावाचून गती नाही अशी कर्मे अधिकमासात करावयास हरकत नाही. नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिकमासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिकमासात करू नयेत असे सांगण्यात येतं, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.


दान करा


अधिकमासात दान करावे असे सांगण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे विशेष महत्व आहे. दान म्हणजे  ‘डोनेशन ‘ नव्हे. डोनेशन कोणी दिले आणि  डोनेशन काय दिले ते जाहीर केले जाते. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले ते गुप्त ठेवायचे असते. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये असे म्हटले जाते. अधिकमासाच्या निमित्ताने समाजातील गरजू गरीब लोकांना तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.


हाच अधिकमासाचा संदेश


"या  अधिक श्रावण महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, जलदान, श्रमदान, धनदान, विद्यादान, फलदान, अनरसे दान करता येईल. शिवाय रक्तदान, नेत्रदान- अवयव दानाचा संकल्प करता येईल. आपण आनंदाने, समाधानाने जगायचेच आणि जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात आनंद-समाधानाची बाग फुलविण्याचा प्रयत्न करावयाचा हाच यावर्षींच्या श्रावण अधिक महिन्याचा संदेश आहे, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. 


यापुढील अधिकमास कधी आणि कसे येणार?


1) 17 मे ते 15 जून 2026 — ज्येष्ठ
2) 16 मार्च ते 13 एप्रिल 2029- चैत्र
3) 19 ॲागस्ट ते 16 सप्टेंबर 2031- भाद्रपद
4) 17 जून ते 15 जुलै 2034 - आषाढ
5) 16 मे ते 13 जून 2037 - ज्येष्ठ
6) 19 सप्टेंबर ते 17 ॲाक्टोबर 2039 - आश्विन
7) 18 जुलै ते 15 ॲागस्ट 2042 - श्रावण
8) 17 मे ते 15 जून 2045 - ज्येष्ठ
9) 15 मार्च ते 13 एप्रिल 2048 - चैत्र
10) 18 ॲागस्ट ते 16 सप्टेंबर 2050 - भाद्रपद


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)