Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीवर पंचकची सावली! `अशी` करा गणपतीची उत्तरपूजा; जाणून घ्या विसर्जन मुहूर्त, मंत्र अन् प्रार्थना
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप देण्यात येतो. यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशी पंचकची सावली आहे. त्यामुळे गणपतीची उत्तरपूजा विधी, मंत्र आणि प्रार्थना जाणून घ्या.
Anant Chaturdashi 2024 : तुमचा आमचा लाडका बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावी निघतो. पुढच्या वर्षी लवकर या, अशा हाक मारत भक्त देत त्याला निरोप देतात. दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह, योग्य उत्तरपूजा करुन विधिवत सागर, नदी, सरोवर वा कृत्रिम तलावात विसर्जित केलं जातं. भक्त यावेळी पुढच्या वर्षी लवकर या म्हणते आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा अशी प्रार्थना करतात. यंदा अनंत चतुर्दशीवर पंचकची सावली आहे. त्यामुळे भक्तगण संभ्रमात आहे. कारण हिंदू धर्मानुसार पंचक काळ हा शुभ मानला जात नाही.
अनंत चतुर्दशी 2024 तिथी
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:04 वाजेपासून 17 सप्टेंबरला सकाळी 11.44 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीला आधार मानून 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, लाभ चोघडिया सकाळी 10.43 ते 12.15 पर्यंत आहे. या काळात तुम्ही पूजा करू शकता.
गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
प्रथम मुहूर्त (चार, लाभ, अमृत) – 09:11 ते 13:47
PM मुहूर्त (शुभ) - 15:19 ते 16:51
संध्याकाळचे मुहूर्त (लाभ) - 19:51 ते 21:1
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 22:47 ते 03:12, 18 सप्टेंबर
गणपती विसर्जन उत्तरपूजा विधी
- सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी.
- गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा.
- गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत.
- आचम्य श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । अक्षतां हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि । श्रीमहागणपतये नमः । सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि ।
वरीलप्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध , फुले , अक्षता , हळद – कुंकू , दूर्वा , शेंदूर हे उपचार वाहावेत.
- श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि । महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप , दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा . कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्प व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत.
- एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात.
- विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा.
- गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.
- गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.
अनंत चतुर्दशीचा गणपती विसर्जन मंत्र
अनेन कृत उत्तराराधनेन तेन श्रीभगवान् सिद्धिविनायकः सांगः सपरिवारः प्रियताम् । ॐ तत्सत्॥
यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)