खग्रास चंद्रग्रहण - सुपरमून - ब्ल्यूमून - आज चंद्राच विलोभनीय दृश्य दिसणार !
नववर्षाच्या सुरूवातीला खगोलप्रेमींना यंदा दोनदा `चंद्राच` विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली आहे.
मुंबई : नववर्षाच्या सुरूवातीला खगोलप्रेमींना यंदा दोनदा 'चंद्राच' विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली आहे.
एकाच महिन्यात दोनदा जगभरात 'सुपरमून' चं दर्शन झालं आहे. आज खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लूमून असा तिहेरी योग आला आहे.
चंद्रग्रहण कधी होणार सुरू ?
आज सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि आपणा सर्वास साध्या डोळ्यांनी सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ‘ ब्लड मून ‘ म्हणतात.
ग्रहण सायंकाळी सात वाजता आहे. त्यावेळी चंद्रबिंब पूर्व आकाशात बरेच वरती आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल, चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल. गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी नेमके काय करावे?
कधी पहाल चंद्राचे विलोभनीय रूप ?
आज सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून रात्री सात वाजून अडतीस मिनिटांपर्यंत पूर्व आकाशात साध्या डोळ्यांनी सुपर, ब्ल्यू, ब्लडमूनचे आपणास विलोभनीय दर्शन घेता येईल.
नासा करणार फेसबुक लाईव्ह
चंद्राचे विलोभनीय पाहताना, त्यातील बदल पाहताना नासाचे तज्ञ याबाबात खास माहिती देणार आहे. त्यामुळे प्रवासात असणार्यांसाठी मोबाईलच्या माध्यमातूनही सुपरमून पाहता येणार आहे.
सूपरमून म्हणजे काय ?
ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. मात्र ‘ सुपरमून ‘ ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.
ब्ल्यूमून दिसणार
एका इंग्रजी महिन्यात ज्यावेळी दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसर्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हणतात. जरी त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र काही ‘ ब्ल्यू ‘ रंगाचा दिसत नाही. यावेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हटलेले आहे.