`या` वस्तूंचे गुप्त दान केल्याने लक्ष्मी होते प्रसन्न
कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या दान केल्यामुळे लक्ष्मी होते प्रसन्न, सर्व कामे होतील पूर्ण
मुंबई : हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की दान केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. पण केलेलं दान कायम गुप्त ठेवावं. गुप्तपणे दान केलं तर ते विशेष फलदायी ठरत असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. दान केल्याने व्यक्तीची गरिबी आणि आर्थिक संकट दूर होतात. परंतु गुप्त दान हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगितलं जातं. ज्योतिष शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गुप्तपणे दान केल्याने फायदा होतो आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
भुकेल्यांना अन्न द्या
हिंदू धर्मात भुकेल्यांना अन्न दान करणं हे सर्वात मोठे पुण्य मानलं जातं. भुकेल्या आणि गरजूंना शक्य तितके अन्न दिले पाहिजे. अशा स्थितीत ओळख लपवूनही तुम्ही भुकेल्यांना अन्न दान करु शकता. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल.
पाण्याचे दान
जलदान हे सर्वात मोठे दान असल्याचं म्हटलं जातं. तहानलेल्या माणसाला पाणी देण्यापेक्षा मोठा परोपकार असूच शकत नाही. विशेषत: पशु-पक्ष्यांना पाणी दिल्यास शुभ फळ मिळते. एखाद्या व्यक्तीने गुप्तपणे पाणी दान केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळू शकेल.
गुळाचे दान
धार्मिक ग्रंथांमध्येही गुळाच्या दानाचे खूप महत्त्व आहे. गुळाचे दान एखाद्याला गुप्तपणे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. गुप्त दान केल्याने देवी-देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.