Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?
Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?
Gudhi Padwa Significance In Marathi: यंदा गुढीपाडवा (Gudhi Padwa) 22 मार्च (22 March 2023) रोजी साजरा करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीनुसार 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करुन नव्याने गोष्टींना सुरुवात करण्याची निश्चयाची गुढी उभारावी असं वयस्करांकडून सांगितलं जातं. याच साऱ्यासाठी गुढीपाडवा साजरा केला जातो. प्रत्येक घरामध्ये अंगणात किंवा शहरांमध्ये बाल्कनीत, दारांसमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारताना एका उंच बांबूच्या काठीवर रेश्मी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, अंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदी अथवा पितळ्याचा गडू बसवला जातो. ही गुढी नव्या सुरुवातीबरोबरच स्नेह, विजय, आनंद आणि मांगल्याचं प्रतिक असल्याचं मानलं जातं. अनेक शुभेच्छांमध्ये विजयाची गुढी असा उल्लेख दिसून येतो. मात्र हा विजय नेमका कसला असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आपल्यापैकी अनेकांना चैत्र महिन्याची सुरुवात या दिवशी होते हे ठाऊक आहे पण गुढी उभारण्याचं कारण काय? यामागे इतर काही कारणं आहे का? असतील तर कोणती याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्यावरच टाकलेला प्रकाश...
चैत्र आणि शालिवाहन
आपल्यापैकी अनेकांना गुढीपाडव्याचं ठाऊक असणारं महत्त्व म्हणजे याच दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतीपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरुन युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात केली. मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य भरुन शत्रूवर मात मिळवण्याच्या शालिवाहनांकडून प्रेरणा घेऊन वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते असं म्हतात. याच दिवशी पुरुषार्ष आणि पराक्रम घडवण्याची प्रतिज्ञा करावी असं म्हटलं जातं. आपल्यातील चंचलपणा, अनिश्चितता, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षामध्ये शांत, स्थिर आणि सात्विक मानाने प्रवेश करावा. तसेच हा प्रवास वर्षभर अशाच पद्धतीने व्हावा अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. याच वाईट प्रवृत्तींवर इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेला विजय गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजरा करायचा असतो, असं म्हणतात.
रामायणानुसार महत्त्व...
रामायणानुसार याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला होता. वालीचा वध करुन रामचंद्रांनी जनतेला त्याच्या जाचामधून मुक्त केलं होतं. त्याचा विजयोत्सव या दिवशी साजरा केला जातो. रामचंद्रांनी वालीचा वध केला, असुरी शक्तींवर दैवी शक्तींनी मिळवलेल्या विजयाचं प्रतिक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते. विशेष म्हणजे याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षांचा वनवासही संपल्याने या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.
ब्रम्हदेव आणि विष्णूंचा संदर्भ
धार्मिक मान्यतांनुसार ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली. याशिवाय या दिवसाचं आणखीन एक महत्त्व म्हणजे भगवान विष्णूंनी मस्त्य रुप धारण करुन शंकासुराचा वधही याच दिवशी केला. त्यामुळे भगवान विष्णूंचा मत्स्यरुपी जन्माचा दिवसही हाच मानला जातो.