गुरुपौर्णिमा 20 की 21 जुलै कधी साजरी होणार? जाणून घ्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त
Guru Purnima 2024 : गुरूंना समर्पित गुरुपौर्णिमा यंदा 20 की 21 जुलै कधी साजरा करण्यात येणार आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. आषाढी शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुपौर्णिमेची अचूक तिथी जाणून घ्या.
Guru Purnima 2024 : हिंदू धर्मात आई वडिलांनंतर गुरूंना देव समान मानलं जातं. या गुरुला समर्पित गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यात साजरा केला जातो. यादिवशी व्यास मुनींचा जन्म झाला असं मानलं जातं. चारही वेदांवर प्रभुत्व असणाऱ्या व्यास ऋषींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यात येते. त्यामुळे आपल्या गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
शास्त्रानुसार या दिवशी स्नान, दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. तसंच स्नान करून जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि गुरु यांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. (gurupurnima 2024 July 20 or 21 method of worship Puja Vidhi and the auspicious time muhurta)
सनातन धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला अधिक महत्त्व दिलं जात. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तो दिवस आषाढ पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. गुरुपौर्णिमा तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत सर्व काही जाणून घ्या.
गुरु पौर्णिमा 2024 तिथी
पंचांगानुसार, आषाढ महिन्याची पौर्णिमा तिथी 20 जुलैला संध्याकाळी 5:59 वाजेपासून 21 जुलैला दुपारी 3:46 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात. त्यामुळे 21 जुलै रविवारी गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येणार आहे.
गुरु पौर्णिमैा पूजा विधी
गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठून देवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करा. यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करा. यावेळी खालील मंत्राचा जप करावा.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः
त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून जगाचे निर्माते भगवान विष्णू आणि वेद व्यास यांना फुले, धूप, दीप, अक्षत, हळद इत्यादी अर्पण करा. यानंतर दिवा लावून आरती करा. गुरु चालिसा आणि गुरु कवचचे पाठ करा. फळे, मिठाई आणि खीर अर्पण करा. शेवटी, जीवनात बुद्धी, ज्ञान आणि शांती मिळावी यासाठी देवाला प्रार्थना करा. या दिवशी गुरूंची सेवा करणे फलदायी मानले जाते. गुरुसह गरिबांना अन्न, पैसा आणि वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)