Holi 2024 : परिसरात होलिका दहन नाही? मग घरी अशी साजरी करा पारंपरिक पद्धतीने होळी
Holika Dahan 2024 : तुमच्या परिसरात होलिका दहन करण्यात येत नाही. अशावेळी घरी तुम्ही पारंपारिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर माहिती दिली आहे.
Holika Dahan 2024 : होळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पौर्णिमा तिथीला रात्री गावोगावी अशो किंवा शहरात होलिका दहन करण्यात येते. त्यासाठी दोन दिवसांपासून परिसरातील उत्साह पोरं लाकड जमा करतात. तरी ज्येष्ठ नागरिक पूजा साहित्याची तयारी करतात. तर महिला होलिका दहन नैवेद्यासाठी पुरणपोळी आणि सागरसंगीत स्वयंपाकाची तयारी पाहतात. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगला विजय म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. (Holi 2024 No Holika Dahan in the area Then celebrate Holi at home in a traditional way)
रासक्ष होलिका भक्त प्रल्हादाचे प्राण घेण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीत बसते. पण विष्णू आपल्या भक्त प्रल्हादाचे प्राण वाचवतो आणि होलिका त्या अग्नीत भस्म होते. या आख्यायिकेनुसार वाईट प्रवृत्तीवर चांगल्या भक्तीचा विजय झाला. म्हणून दरवर्षी पंचांगानुसार पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. होलिका दहनामागे धार्मिक कारण तर आहेच पण या सणातून आपल्या आयुष्यातील नकारात्मक दूर करण्यासाठीचा हा उत्सव आहे.
अशात जर तुमच्या बिल्डिंग किंवा परिसरात होलिका दहन होणार नसेल तर काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी कुठलीही कर्मकांड नाही तर पारंपरिक पद्धतीने होळी कशी साजरी करावी याबद्दल सांगितलं आहे.
पारंपरिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची?
घरात होळी साजरी करताना अग्नीपासून धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा जागेची निवड तुम्ही करावी. ज्या ठिकाणी तुम्ही होळी पूजा करणार आहात तिथे गायीच्या शेणाने सारावून घ्यावे. ही गोष्ट शक्य नसेल तर ती जागा झाडून पुसून स्वच्छ करा. आता गोमूत्र पाण्यात टाकून त्या जागेवर शिंपडा. आता त्या जागेच्या अगदी मधोमध रांगोळी काढा. व्हिडीओमध्ये आनंद पिंपळकर यांनी रांगोळीचे डिझाईन सांगितलंय.
आता या रांगोळीवर मधोमध मूठभर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवा. आता या शेजारी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या ठेवाव्यात. 7,11 किंवा 3 जशा तुम्हाला शक्य आहे. त्यानंतर एरंड्याची फांदी बाजारात मिळते ती ठेवा. या फांदीला होलिका दहनात विशेष महत्त्व आहे. आता त्याच्याभोवती लाडकं किंवा छोट्या कांड्याही लावू शकता.
हेसुद्धा वाचा - होळीच्या दिवशी भद्राचं सावट, 1 तासांचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पंचांगकर्ते आनंद पिंपळकर यांच्याकडून होलिका दहनाबद्दल
आता ही मांडणी झाल्यानंतर पूर्व पश्चिम बसा आणि या होलिका दहनासमोर जराशा तांदळावर सुपारी ठेवून गणेशाची पूजा करा. हळदी कूंकू अर्पण करुन आवाहन करा की आमच्या घरातील सर्व विघ्न नष्ट होऊ दे. होलिकेचा आशिर्वाद आम्हाला मिळू दे.
त्यानंतर होलिकेची पूजा करा. हळदी कूंकू अर्पण करुन दिवा उदबत्ती लावा आणि गूळ खोबर दाखवा. आता होलिकेला नमस्कार करुन म्हणायचं आहे की, आमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टीचं या अग्नीत दहन व्हावं. आता होलिकेच्या आजूबाजूला कापूर लावून तूपाच्या वाती घ्यायच्या आणि होलिका दहन करायचं.
होलिका दहन केल्यानंतर जेव्हा व्यवस्थित अग्नी प्रज्वलित होईल तेव्हा अग्नीला नमस्कार करायचा आणि तिचा आशिर्वाद घ्यायचा. अग्नीची धक आपल्या हाताने घेऊन हृदयाला लावायचा. मग तांब्याभर पाणी घेऊन होलिके भवती तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तिसऱ्या प्रदक्षिणेला आपल्या हाताने बोंब मारायची. त्यानंतर घरात जो पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तो होलिकेला अपर्ण करायचं. त्यासोबत होलिकेला एक नारळदेखील अर्पण करा. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनीही 3 किंवा 7 प्रदक्षिणा माराव्यात.
धुरवड किंवा धुलिवंदनाला काय करायचं?
आता दुसऱ्या दिवशी धुरवड किंवा धुलिवंदनाला काय करायचं याबद्दलही आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. ते म्हणात की, दुसऱ्या दिवशी होलिकेची राख अजूनही गरम असेल तर त्यावर पाणी गरम करावं. ते शक्य नसेल तर होलिकेची राख घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)