Ganapati Pandal Insurance Cover whooping INR 360 Crores: भारतामधील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ अशी ओळख असलेल्या सीएसबी सेवा मंडळ यंदाच्या गणेशोत्सवासाठी सज्ज झालं आहे. या गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा उतरवला आहे. यासंदर्भातील माहिती मंडळानेच दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुरु असून या तयारीचा भाग म्हणूनच हा विमाही उतरवण्यात आल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे.


20 हजार भक्तांना अन्नदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भक्तांमध्ये नवसाला पावणारा विश्वाचा राजा नावाने प्रसिद्ध असलेल्या या गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 69 वं वर्ष आहे. या महागणपतीच्या मुखदर्शनाचा सोहळा 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मंडळाने केलेल्या दाव्यानुसार शहरातील हे एकमेव असं मंडळ आहे जिथे पारंपारिक विधी (पूजा, अर्जन सेवा, अन्नदान यासारख्या गोष्टी) 24 तास सुरु असतात. सामान्यपणे दरवर्षी सरासरी 60 हजार पूजा तसेच सेवा या महागणपतीच्या चरणी अर्पण केल्या जातात. अन्नदानाच्या माध्यमातून केळीच्या पानावर दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा दरवर्षी 20 हजारहून अधिक लोक लाभ घेतात. या महागणपतीची मूर्ती शाडूच्या मातीबरोबरच गवत आणि नैसर्गिक रंगांपासून तयार करण्यात आलेली असते. ही मूर्ती पूर्णपणे इको फ्रेण्डली असल्याचं मंडळाने सांगितलं आहे. कागद वाचवण्याच्या उद्देशाने मंडळाने पारंपारिक पद्धतीने पावती देणं बंद केलं असून डिजीटल स्वरुपामध्ये भक्तांना दानधर्मासंदर्भातील पावती दिली जाते. मंडळ हरित धोरणानुसार काम करतं, असं मंडळाचे प्रवक्ते आणि ट्रस्टी असलेल्या अमित पै यांनी सांगितलं.


66 किलो सोनं अन् 295 किलो चांदी


गणेशोत्सव जवळ येत असल्याने जीएसबी सेवा मंडळाकडून बप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून या तयारीमध्ये विमा संरक्षणाचाही समावेश आहे. देशातील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या अंगावर 66 किलो सोन्याचे दागिने चढवले जातात. तसेच 295 किलोंहून अधिक किलो चांदी आणि इतर मौल्यवान गोष्टींनी गणरायांना सजवलं जातं. मागील वर्षी या गणेशोत्सव मंडळाने 316 कोटी 40 लाखांचा विमा उतरवला होता. यंदा या मंडळाने गणेशोत्सव मंडळाने उतरवलेल्या विम्याचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा उतरवला आहे.


कशासाठी किती विमा?


द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जीएसबी सेवा मंडळाने हा विमा उतरवला आहे. गणपतीवर चढवण्यात आलेल्या सोन्या चांदीचे दागिणे आणि इतर धोक्यांसंदर्भातील विम्याची रक्कम 38.47 कोटी रुपये इतकी आहे. आग लागणे, भूकंप किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील विमा हा 2 कोटींचा आहे. मंडप, मंच आणि भक्तांचा विमा हा 30 कोटींचा आहे. स्वयंसेवक, स्वयंपाकी आणि या मंडपामध्ये काम करणाऱ्या सर्वांचा एकूण 289.50 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. आग आणि इतर दुर्घटनांसंदर्भात विम्याची रक्कम 43 लाखांची आहे.