मुंबई: बऱ्यादचा असं म्हटलं जातं की लक्ष्मी ही पैसाच नाही तर घरातील धनधान्य समृद्धी आणि संपत्ती या तिन्ही गोष्टी सोबत घेऊन येते. तर कधी वेगवेगळ्या रुपात आपलं घर भरत राहाते. लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी मानली जाते. जर माता लक्ष्मी कुणावर प्रसन्न असेल तर ती व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होते. त्याचवेळी लक्ष्मी मातेचा राग किंवा रुसली असेल तर त्या घरातील समृद्धी, पैसा आणि धनधान्य हळूहळू कमी होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तूनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या माता लक्ष्मीला आवडत नाहीत. माता लक्ष्मी नेहमी स्वयंपाक घरात राहाते असं म्हणतात. अन्नपूर्णा देखील स्वयंपाक घरात असल्याने ती देखील रूसू नये यासाठी काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. काही गोष्टी या जर आपण पाळल्या नाहीत तर लक्ष्मी निघून जाते असं म्हणतात. आपल्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहावी म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घेऊया. 


पीठ- पीठाशिवाय स्वयंपाकघर अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. ज्यापासून आपण भाकरी, पोळी किंवा इतर पदार्थ तयार करतो. नेहमी पीठ घरात भरलेलं असावं. कधीही पीठाचा डबा पूर्ण रिकामा करू नये असं म्हटलं जातं. वास्तूशास्त्रानुसार पीठाचा पूर्ण डबा रिकामा असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या प्रतिमेला ठेच पोहोचू शकते असंही म्हटलं जातं.


हळद- हळदीचा वापर शुभ कार्यासाठी केला जातो. घरात हळद संपणे अत्यंत अशुभ आहे. यामुळे गुरू ग्रहाचा दोष होतो. जर स्वयंपाकघरात हळद संपली तर चांगल्या कामात अडथळे येतात असंही फार पूर्वीपासून मानण्याची परंपरा आहे. 


मीठ- घरात मीठ सांडू नये असं म्हणतात. इतकच नाही तर मीठाचा डब्यात खडखडाट असू नये असंही म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.


तांदूळ- पूजेमध्ये तांदळाचा वापर केला जातो. पण जेव्हा स्वयंपाकघरात तांदूळ पूर्णपणे संपतो तेव्हा शुक्र ग्रहाला दोष दिला जातो. यामुळे घरात पैशाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील तांदूळ पूर्णपणे संपणार नाही याची काळजी घ्या.


(सूचना- या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही.)