Papmochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला खरोखरच सर्व पापांचा नाश होता का? काय आहे कथा, जाणून घ्या
Papmochani Ekadashi 2024 : यंदा पंचक काळाच्या सावलीत पापमोचनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. चैत्र नवरात्रीपूर्वी येणाऱ्या या एकादशी व्रताने खरंच सर्व पापांचा नाश होतो का?
Papmochani Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोन म्हणजे वर्षाला 24 एकादशी येत असतात. एक एकादशी कृष्ण आणि दुसरी शुक्ल पक्षात एकादशी असते. एप्रिल कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण आहे. ही एकादशी पंचक काळाच्या सावलीत आल्यामुळे ती साजरी करायची नाही असा प्रश्न भक्तांना पडला आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. पंडित आंनदी वास्तूचे आनंद पिंपळकर म्हणतात की, पंचक असलं तरी पापमोचनी एकादशीचं व्रत करता येणार आहे.
तर एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतं. पापमोचनी एकादशी नेमकी कधी आहे. हे व्रत केल्यामुळे खरंच पाप नष्ट होतात का? काय आहे यामागील आख्यायिका जाणून घ्या.
पापमोचनी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त !
पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 4 एप्रिल 2024 दुपारी 04:14 वाजेपासून 5 एप्रिल 2024 ला दुपारी 01:28 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार 5 एप्रिल 2024 पापमोचनी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यामुले 5 एप्रिलला सकाळी 07:41 ते 10:49 वाजेपर्यंत तुम्ही भगवान विष्णूची पूजा करु शकता.
पापमोचनी एकादशीला शुभ योग!
पापमोचनी एकादशीला अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आला आहे. एकादशीला रुद्राभिषेक केल्यास घरात सुख समृद्धी नांदण्यास मदत होणार आहे. तर यादिवशी सकाळी 9.56 वाजेपर्यंत साध्ययोग आहे.
हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण इतका खास का? जाणून घ्या रंजक तथ्यासह तिथी आणि शुभ मुहूर्त
पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापांचा नाश होता का?
पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापांचा नाश होता का याबद्दल हिंदू धर्मात आख्यायिका सांगण्यात आली आहे. एका पुराणात असा उल्लेख आहे की, श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला पापमोचनी एकादशी व्रताचं महत्त्व सांगितलंय. पौराणिक आख्यायिकेनुसार चैत्ररथ नावाच्या सुंदर जंगलात अप्सरा फिरायच्या. या वनात मेधवी नावाचा एक ऋषी तपश्चर्या करण्यासाठी आला. हा ऋषी शिवभक्त होता पण अप्सरा या शिवाच्या शत्रू कामदेवाच्या अनुयायी होत्या. अशात एकदा कामदेवाने ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरेला पाठवलं.
मंजू नावाच्या अप्सरेने आपल्या सौंदर्य, नृत्य आणि गायनाने ऋषीची तपश्चर्या उधळून लावली. या मंजू अप्सरासोबत ऋषी अनेक वर्षे ऐषारामात राहिला. काही वर्षांनी मंजूने तिथून जाण्यासाठी ऋषीकडे परवानगी मागितली. त्यावेळी ऋषीला आपली चूक लक्षात आली. त्या अप्सराच्या कृतीमुळे ऋषी संतप्त झाला आणि त्याने मंजूला पिशाच बनण्याचा शाप दिला. अप्सरा ऋषीच्या पाया पडली आणि शाप मागे घेण्यासाठी गयावया करु लागली. तिच्या अनेक विनंतीनंतर ऋषीने सांगितलं की, पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यास तुझे सर्व पाप नष्ट होतील आणि तुला अप्सरेचं रुप प्राप्त होईल असं सांगितलं.
दुसरीकडे ऋषींनीही पाप केल्यामुळे त्याचे पुण्य नष्ट झाले होते. प्रायश्चितासाठी ऋषी मेधवीनेही पापमोचनी एकादशीचे व्रत केलं. अशाप्रकारे पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यामुळे अप्सरा पापमुक्त झाली आणि स्वर्गात गेली. तर ऋषींच्याही सर्व पापांचा नाश झाला.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)