मुंबई : उद्या रविवारी  गुढीपाडवा ! चैत्र शुक्ल प्रतिपदा-  साडेतीन मुहूर्तातील एक दिवस ! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या शालिवाहन  शक १९४० विलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या  भारतीय  नूतन वर्षामध्ये ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने हे वर्ष तेरा महिन्यांचे होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती सांगताना श्री. सोमण म्हणाले की   हे नूतन वर्ष १८ मार्च २०१८ पासून शुक्रवार,५ एप्रिल२०१९ पर्यंत आहे. या नूतन वर्षी अधिक ज्येष्ठमास १६ मे पासून १३ जूनपर्यंत येत आहे. त्यामुळे वटपौर्णिमेपासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशीरा येत आहेत. 


या वर्षामध्ये एकूण तीन सूर्य ग्रहणे व  दोन चंद्रग्रहणे होणार आहेत. शुक्रवार २३ जुलैचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. मात्र १३ जुलै२०१८ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ११ आगस्ट  २०१८ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ५ जानेवारी २०१९ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण आणि २१ जानेवारी २०१९ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.सुवर्ण खरेदीदारांसाठी  या नूतन वर्षांमध्ये ९ आगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ आक्टोबर  असे एकूण तीन गुरुपुष्य योग येणार आहेत.गणेशभक्तांसाठी  ३ एप्रिल, ३१ जुलै आणि २५ डिसेंबर अशा एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहेत. या नूतन वर्षांमध्ये विवाहोत्सुकांसाठी वैशाख , निज ज्येष्ठ, आषाढ, मार्गशीर्ष, पौष , माघ आणि फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त


जिज्ञासूंसाठी पुढील दहा वर्षातील गुढीपाडव्याचे दिवसही श्री. दा. कृ. सोमण यांनी दिले आहेत. यापुढे शनिवार दि. ६ एप्रिल २०१९, बुधवार दि. २५ मार्च २०२०, मंगळवार दि.१३ एप्रिल २०२१, शनिवार दि. २ एप्रिल २०२२, बुधवार दि. २२ मार्च २०२३, मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४, रविवार दि. ३० मार्च २०२५, गुरुवार दि. १९ मार्च २०२६, बुधवार दि. ७ एप्रिल २०२७ आणि सोमवार दि. २७ मार्च २०२८  रोजी गुढीपाडवा येणार आहे.