Gauri Avahan 2022: गणपतीपाठोपाठ घरोघरी गौरीचं पण आगमन होतं. महाराष्ट्रात अनेक घरी गौरी माहेरी येतात असं म्हटलं जातं. गौरी पूजनाची पद्धत महाराष्ट्रात प्रत्येक गावानुसार वेगवेगळी आहे. कोकणात गौरी आगमन होतं तिथे सुद्धा गौरीची पूजा वेगवेगळी आहे. विदर्भात महालक्ष्म्या आगमन असं म्हटलं जातं. कुठे उभ्या तर कुठे खड्यांचा गौरी असतात. तर कुठे तेरड्याची रोपे एकत्र करुन त्याला गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून पुजा केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरी ही साक्षात माता पार्वतीचं रुप मानलं जातं. त्यामुळे पार्वती माता घरी येणं म्हणजे ती माहेरीपणाला आली असं म्हटलं जातं. त्यामुळे माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जाते. गणपती 31 ऑगस्ट म्हणजे येत्या बुधवारी येत आहेत तर त्याचा पाठोपाठ गौराई कधी येणार आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. यंदा 3 सप्टेंबर येत्या शनिवारी गौराईचं आवाहन तर 4 सप्टेंबर गौरी पूजन केले जाणार आहे. तर 5 सप्टेंबरला गौरी विसर्जन होणार आहे. 


त्यामुळे ज्यांचा घरी 5 दिवसांचं बाप्पा आहे त्यांचं विसर्जन 5 सप्टेंबरला गौरीसोबत होणार आहे. याचा अर्थ यंदा 5 दिवसांचं बाप्पा एक दिवस जास्त आपल्यासोबत राहणार आहे. (trending news Gauri Avahan 2022 muhurt pooja vidhi Visarjan Vidhi and importance Of Gauri Pujan)


आगमन, पूजन आणि विसर्जन मुहूर्त


ज्येष्ठ गौरी आवाहन शुभ मुहूर्त - पहाटे 6.03 पासून ते संध्याकाळी 6.36 पर्यंत


ज्येष्ठ गौरी पूजा मुहूर्त - 3 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपासून 4 सप्टेंबर रात्री 9.40 वाजेपर्यंत


एकूण अवधी - 12.28


गौरी विसर्जन मुहूर्त -  5 सप्टेंबरला दुपारी 12.23 ते संध्याकाळी 7.23 वाजेपर्यंत 


ज्येष्ठा गौरी आवाहन विधी 


परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचा पाय दुध आणि पाण्याने धुवावे आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढला जातो. घरच्या उंबऱ्यावर आत येताना पाच धान्याचे स्टीलचे ग्लास भरून ठेवा आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमठावा. यानंतर शंख वाजवून गौरीचं घरात आगमन करा. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना करा. 


यानंतर गौरीचं स्थापना करा. म्हणजे गौरीला साडी, दागिने घालून सजवा आणि पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचं नैवेद्य दाखवा. 


ज्येष्ठा गौरी पूजन 


गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची परंपरा आहे. यादिवशी सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. नैवेद्य दाखवावा. दुपारी पूरण पोळी, सोळा भाज्या एकत्र कराव्यात, देव फळ, आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी, इ. बनवून नैवेद्य दाखवा.


सायंकाळी हळदी,कुंकाचा कार्यक्रम ठेवावा. महाराष्ट्रातील अनेक भागात गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना जेवण्यासाठी बोलवण्याची परंपरा आहे.  


ज्येष्ठा गौरी विसर्जन 


तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं. या दिवशी सकाळी सुतात हळदी, कुंकू, बेल फळ, झेंडूची पाने, झेंडूची फुले, काशी भोपळा फूल, रेशमी धागा यांचे प्रत्येकी एक एक गाठ बांधून गाठी तयार कराव्यात. गौरी महालक्ष्मीच्या ओठीत किंवा डोक्यावर ठेवा नंतर गौरी महालक्ष्मीची आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखवावे आणि गौरीचं विसर्जन करावे.



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)