Vastu Tips: घराबाहेर लावलेली अशी नेम प्लेट देते शुभ परिणाम, काय सांगतं वास्तूशास्त्र जाणून घ्या
नेम प्लेटवर त्या व्यक्तीचं नाव, पोस्ट आणि शिक्षण अधोरेखित केलेलं असतं. या नेम प्लेटवरून त्या माणसाचं व्यक्तिमत्त्व कळतं.
Name Plate For Good Luck: वास्तूशास्त्रात घराबाबत अनेक नियम सांगितले आहे. वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. घरातील वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात याबाबत माहिती दिलेली आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या मुख्य दिशांसोबत उपदिशांबद्दल सांगितलं आहे. तुम्ही कधी कोणच्या घरी अथवा, कोणाला ऑफिसात भेटायला गेलात तर तुम्हाला दरवाज्यावर नेम प्लेट पाहायला मिळते. या नेम प्लेटवर त्या व्यक्तीचं नाव, पोस्ट आणि शिक्षण अधोरेखित केलेलं असतं. या नेम प्लेटवरून त्या माणसाचं व्यक्तिमत्त्व कळतं. ऑफिस आणि घराबाहेर लागलेली नेम प्लेट तुम्हाला सुख, समृद्धी, प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळवून देते. वास्तूशास्त्रात नेम प्लेटचं महत्त्व सांगितलं आहे. चुकीच्या पद्धतीने बनवलेली नेम प्लेट कसं नुकसान पोहोचवते याबद्दल सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमकी नेम प्लेट कशी असावी.
घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला नेम प्लेट लावली पाहीजे. या नेम प्लेटवर पूर्ण नाव ठळक आणि पद छोट्या अक्षरात स्पष्ट लिहिलेलं असावं. वाकड्या तिकड्या लिपीत लिहू नका, कारण यामुळे अडचणी वाढू शकतात. नेम प्लेट एकदम व्यवस्थितरित्या बसवलेली असावी. जर नेम प्लेट इंग्रजीत असेल तर पहिलं अक्षर कॅपिटल असायला हवं. नेम प्लेट जमिनीपासून पाच फुटांच्या उंचीवर लावली पाहीजे. त्याचबरोबर लिफ्टच्या समोर नसावी.
नेम प्लेटचा रंग आणि त्याची दिशा खूप महत्त्वाची आहे. नेम प्लेटचा रंग काळा नसावा. पूर्व दिशेला क्रीम, ईशान्य दिशेला निळी, वायव्य दिशेला हलका निळा, पश्चिम दिशेला पिवळी किंवा पांढरी, नैऋत्य दिशेला पिवळी, दक्षिण दिशेला जांभळी नेम प्लेट असावी. आग्नेय दिशेला लाल किंवा केसरी रंगाची नेम प्लेट असावी.
घराबाहेर नेम प्लेट लावली असेल तर स्वच्छतेचीही काळजी घ्या. नेम प्लेटखाली कचरा, घाण, झाडू इत्यादी ठेवू नयेत. नेमप्लेट कोणत्याही कारणास्तव तुटली तर ते काढून टाकले पाहिजे. नेम प्लेटवर प्राणी, पक्षी किंवा देवतांची चित्रे लावू नका. नेमप्लेटवर शुभ चिन्हे लावू शकता. नावाची पाटी जितकी उजळ असेल तितके नशीब उजळेल.
वास्तुशास्त्रानुसार नेम प्लेट रविवारी लावावी. कारण रविवार सूर्यदेवाशी संबधित वार आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नाव आणि प्रतिष्ठेचा कारक आहे. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशासारखं आपलं नाव चमकतं, असं वास्तूशास्त्रात बोललं जातं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)