Vinayaka Chaturthi 2022: आज वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
#vinayakachaturthi : विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा विधीपूर्वक केल्यास भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व...
Vinayaka Chaturthi 2022 : 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यातच आज या वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते. जो पंचांगानुसार आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी ठेवला जाईल. या दिवशी गणपतीची पूजा पूर्ण भक्तीभावाने केल्यास जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्राला विशेष महत्त्व आहे. कारण दिवसभर व्रत पाळल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य दिल्याने व्रत मोडते. विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
विनायक चतुर्थी 2022 शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 डिसेंबरला पहाटे 4.51 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला पहाटे 1.37 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार उद्या म्हणजेच 26 डिसेंबर रोजी विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 26 डिसेंबर रोजी सकाळी 11.20 ते दुपारी 1.24 पर्यंत असेल. या मुहूर्तावर गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
चतुर्थीची पूजा पद्धत
विनायक चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी लोक भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी. त्यानंतर तेथे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरून श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर गंगाजलाने शुध्दीकरण करून गणेशाला रोळी, चंदन आणि अक्षत यांचा टिळक करून त्यांना दुर्वा अर्पण करून 21 लाडू अर्पण करावेत. यानंतर दिवसभर फळे खाल्ल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)