प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं मुंबईतील `हे` विठ्ठल मंदिर; संत तुकाराम महाराजांनी रचला होता पाया
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणाऱ्या मुंबईतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे.
Ashadhi Ekadadshi 2024 : जुलै महिन्यात येणाऱ्या आषाढी वारीला मोठी परंपरा आणि इतिहास लाभलेला आहे. राज्यभरात सध्या वारीचा मोठा उत्साह पहायाला मिळत आहे. टाळमृदुंगाच्या गजरात आणि संतांच्या जयघोषात दंग होणारे वारकरी दरवर्षी माऊलीच्या भेटीसाठी हजारो किलोमीटर पायपीट करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वैष्णवांचा सोहळा हा आषाढीत चंद्रभागेच्या तिरी भक्तीरसात न्हाऊन निघतो. वारीची परंपरा अखंड सुरु ठेवणारी अनेक कुटुंब आहेत. मात्र नोकरीची वारी करणाऱ्या चाकरमान्यांना पंढरपूरीच्या विठ्ठलांच्या पायावर माथा टेकवणं जमत नाही. असं असलं तरी मुंबईतील प्रतिपंढरपुरात देखील आषाढी वारीचा मोठा उत्सव असतो.
मुंबईतील वडाळा परिसरात असलेल्या 'विठ्ठल रुक्मिणी' मंदिराला मोठा इतिहास आहे. हे मंदिर प्रचीन असून मंदिराचं साधेपण अजून ही टिकून आहे.असं म्हणतात की, या मंदिराचा संत तुकाराम महाराजांशी जवळचा संबंध आहे. मीठाच्या व्यापारासाठी तुकाराम महाराज या ठिकाणी येत असे. त्यावेळी इथल्या वडाच्या झाडाखाली बसून तुकाराम महाराज लोकांना किर्तानातून भक्तीचा मार्ग सांगत असे. अंदाजे 400 वर्षांपुर्वी या ठिकाणी तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या मंदिराचा पाया रचला. या ठिकाणी अनेक वडाची झाडं होती, म्हणून येथील परिसराला वडाळा असं नाव देण्यात आलं.मंदिराच्या परिसरातील हे वडाचं झाड खूप जुनं असून तुकाराम महाराजांच्या स्मरणार्थ या झाडाची कायम काळजी घेतली जाते.
मंदिराप्रमाणेच इथल्या विठ्ठल मुर्तीची गोष्ट देखील तितकीच रंजक आहे. पुर्वीच्या काळी मुघलसाम्राज्य हिंदू देवतांची विटंबना करित म्हणून देवांच्या मुर्त्या कोणी जमिनीत पुरुन ठेवत तर कोणी पाण्यात सोडून देत होते. असं म्हणतात की, वडाळा परिसरातील एक गृहस्थ पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते.त्यावेळी चंद्रभागेच्या तिरावर त्यांना विठ्ठलाची एक मूर्ती सापडली. त्यानंतर या मुर्तीची स्थापना मुंबईत करण्यात आली.
काहींच्या मते असं देखील म्हटलं जातं की, वडाळ्याच्या मिठागरात काम करणाऱ्या कामगारांना विठ्ठलाची मूर्ती सापडली तेव्हा स्थानिकांनी या ठिकाणी विठ्ठल मंदिराची स्थापना केली. आज या ठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रतिपंढरपुर म्हणून ओळखलं जातं. आषाढी एकादशीला मंदिर परिसरात मोठा उत्सव पाहायला मिळतो. संत तुकाराम महाराजांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. वारीला न जाऊ शकणारे मुंबईकर या प्रतिपंढरपुरातील विठ्ठालाच्या चरणी नतमस्तक होतात.