Lord Shiva Birth Story In Marathi: 18 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय. असं म्हणतात श्रावण महिना भगवान महादेवाचा सर्वात प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा आणि व्रतवैकल्य भाविक करतात. तर, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उसळलेली असते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की, भगवान शिव या महिन्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पृथ्वीतलावर वास करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवान शिव यांच्याबरोबर पत्नी माता पार्वती, पुत्र कार्तिकेय, गणेश आणि पुत्री अशोक सुंदरी यांच्याबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहितीये का भगवान शिव यांचे आई-वडील कोण आहेत आणि महादेवाचा जन्म कसा झाला आहे. शिवपुराणात भगवान महादेवाच्या जन्माबाबत उल्लेख आढळतो. तर जाणून घेऊया कोण आहेत भगवान महादेवांचे आई-वडील. 


देवीभागवत महापुराणात शंकराच्या आई-वडिलांचा उल्लेख आढळतो. एकदा नारदमुनींनी त्यांचे पिता ब्रह्माजींना विचारले की कोणते विश्व कोणी निर्माण केले? तसेच भगवान विष्णू, भगवान शिव आणि तुमचे वडील कोण आहेत?, असा प्रश्नही त्यांनी केला. नारदमुनींच्या प्रश्नांचे उत्तर देताना ब्रह्माजींनी त्रिदेव आणि त्यांच्या पालकांच्या जन्माविषयी सांगितले. 


ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्मा यांच्या संयोगातून झाली. म्हणजे निसर्गाच्या रूपातील देवी दुर्गा ही आपल्या तिघांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आपला पिता आहे, असं ब्रम्हा यांनी नारदमुनींना सांगितले.


महादेवांच्या आई-वडिलांबाबत आणखी एक उल्लेख आढळतो. यानुसार एकदा भगवान ब्रम्हा आणि विष्णू यांच्यात एका गोष्टीवरुन भांडण झाले. तेव्हा ब्रह्माजी विष्णूला म्हणतात, मी तुझा पिता आहे कारण ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे, मी प्रजापिता आहे. त्यावर भगवान विष्णु म्हणतात, मी तुमचा पिता आहे, कारण तुमचा जन्म माझ्या नाभी कमळापासून झाला आहे.


ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील हे भांडण ऐकून सदाशिव तेथे पोहोचले आणि म्हणाले, पुत्रांनो, मी तुम्हाला जगाच्या उत्पत्तीचे आणि स्थितीचे कार्य दिले आहे. त्याचप्रमाणे मी शिव आणि रुद्राला विनाश आणि संहाराचे कार्य दिले आहे. मला पाच तोंडे आहेत - निराकार (अ), दुसरा उकार (उ), तिसरा मुख (म), चौथा बिंदू (.) आणि पाचवा ध्वनी (ध्वनी) प्रकट झाला आहे. या पाच तत्वांशी एकरूप होऊन 'ओम' जन्माला आला, जो माझा मुख्य मंत्र आहे.