गोल्फपटू आर्यमान सिंहने रचला इतिहास
दहा वर्षांच्या आर्यमान सिंह याने या वर्षीच्या मोसमाचा शेवट धमाकेदार करत नवा इतिहास रचला आहे.
पुणे : दहा वर्षांच्या आर्यमान सिंह याने या वर्षीच्या मोसमाचा शेवट धमाकेदार करत नवा इतिहास रचला आहे.
यावर्षी इंडियन गोल्फ युनियनच्या पश्चिम विभागीय स्पर्धेत आर्यमान सिंह याने प्रभावी कामगिरी केली आहे. आर्यमानने केलेल्या या कामगिरीमुळे त्याने स्वत:चाच विभागीय आणि राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.
आर्यमान हा गेल्या चार वर्षांत एकदाही पराभूत झालेला नाहीये. त्याने ज्या कुठल्या स्पर्धेत सहभाग घेतला त्या सर्वच स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत.
आर्यमान याच्या विजयाची मालिका १२६६ दिवसांपासून सुरुच आहे. भारताच्या ज्युनिअर गोल्फ क्षेत्रामध्ये ही सर्वाधिक प्रदीर्घ विजयी वाटचाल केली आहे. आर्यमानने अहमदाबादच्या केन्सविले गोल्फ कोर्समध्ये ट्रॉफी जिंकली. त्यानंतर होम टाऊनमध्ये पूना गोल्फ कोर्स येथे झालेली स्पर्धा जिंकून सलग दुसरा विजय मिळवला.
मग, ऑक्सफोर्ड गोल्फ अँड कंट्री क्लब तसेच गायकवाज बडौदा गोल्फ कोर्समध्ये विजय मिळवला. अहमदाबादच्या गुलमोहर ग्रीन्स गोल्फ कोर्समध्ये आर्यमानने सलग चार वर्षांपर्यंत विजय मिळवला आहे.