पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्टला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पर्थमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियातला हा सामना रंगेल. पण भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट आणि पर्थचं मैदान म्हणलं की आठवते ती ईशांत शर्माची भेदक कामगिरी. ईशांत शर्मानं रिकी पाँटिंगला टाकलेला तो स्पेल आजही अनेक क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. या स्पेलमुळेच ईशांत शर्माला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरी ओळख मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता १० वर्षानंतर पुन्हा एकदा पर्थमध्ये सामना होणार आहे. भारताच्या टीममध्ये आजही ईशांत शर्मा आहे. १० वर्षांपूर्वीची टेस्ट खेळलेला ईशांत हा एकमेव खेळाडू सध्याच्या टीममध्ये आहे. ईशांत शर्मानं पर्थमधल्या वाका मैदानात तो वादळी स्पेल टाकला होता. शुक्रवारपासून सुरु होणारी मॅच मात्र वाकावर नसून ऑप्टस या नव्या स्टेडियमवर आहे.


पर्थवर १० वर्षांपूर्वी झालेल्या त्या मॅचमध्ये ईशांत शर्मानं दोन्ही इनिंग मिळून फक्त ३ विकेट घेतल्या होत्या. ईशांतपेक्षा अनिल कुंबळे, आरपी सिंग आणि इरफान पठाण यांना जास्त विकेट मिळाल्या होत्या. तरीदेखील ईशांत शर्माच्या स्पेलचीच चर्चा झाली आणि आजही होते.


३० वर्षांचा असलेल्या ईशांत शर्माचा कदाचित हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. १० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ईशांतनं ८८ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं २५९ विकेट घेतल्या आहेत. आपल्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ईशांत शर्मा पर्थमध्ये पुन्हा एकदा २००८ सालच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मैदानात उतरेल.


ईशांत शर्माचा तो वादळी स्पेल



सचिनकडूनही ईशांतचं कौतुक


ईशांत शर्मानं पर्थच्या मैदानावर टाकलेल्या त्या स्पेलचं सचिन तेंडुलकरनं त्याच्या आत्मचरित्रात कौतुक केलं आहे. शेवटचा दिवस टेस्ट क्रिकेटचं एक शानदार उदाहरण होतं. त्या दिवशी ईशांत शर्मानं टाकलेला स्पेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढ्या वर्षात मी बघितलेला भारतीय बॉलरनी टाकलेला सर्वोत्तम स्पेल होता, असं सचिन म्हणाला. ईशांतनं त्यादिवशी रिकी पाँटिंगच्या नाकी नऊ आणले होते. मी मिड ऑफला उभा होतो आणि ईशांतला त्याच टप्प्यावर बॉलिंग टाकायला सांगत होतो, असं सचिननं त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.


पर्थमध्ये भारताचा विजय


२००८ साली १६-१९ जानेवारीदरम्यान पर्थमध्ये ही टेस्ट मॅच खेळण्यात आली नव्हती. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता. भारतानं या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ३३० आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २९४ रन केले. ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग २१२ रनवर संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना विजयासाठी ४१३ रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान रोखताना ईशांत शर्मानं रिकी पाँटिंगला मैदानात नाचवलं.


१९ जानेवारी २००८ ची तारीख


१९ जानेवारी २००८ या दिवशी ईशांत शर्मानं टाकलेला तो स्पेल जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगला खेळणं जमलंच नाही. ईशांत शर्मानं टाकलेले बॉल रिकी पाँटिंगच्या बॅटच्या इनसाईड एज आणि आऊटसाईड एज घेत होते. मैदानात रिकी पाँटिंगचा संघर्ष सुरु असतानाच ईशांतच्या एका बॉलनं त्याचा घात केला.


...तर पाँटिंग वाचला असता


ईशांत शर्माला खेळत असताना पाँटिंग एकसारखा बावचळत होता. पाँटिंग हा स्पेल खेळून गेला असता तर तो आरामात पुढे गेला असता आणि आम्हाला मिळालेली संधी हुकली असती. कर्णधार अनिल कुंबळेला ईशांतला आराम द्यायचा होता, पण काही वरिष्ठ खेळाडूंनी कुंबळेवर ईशांतला आणखी बॉलिंग देण्यासाठी दबाव आणला. कुंबळेनंही वरिष्ठ खेळाडूंचं म्हणणं ऐकलं आणि आमचा डाव यशस्वी झाला, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.