चेन्नई : २०१३ हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. या काळात मी सर्वाधिक निराश होतो, असं वक्तव्य धोनीने केलं आहे. २०१३ साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नईची टीम अडचणीत आली होती. 'रोअर ऑफ द लायन' या डॉक्युमेंट्रीमध्ये धोनीने या वादावर भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'२०१३ हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण वर्ष होतं. आयुष्यात मी एवढा निराश कधीच झालो नव्हतो. २००७ सालच्या वर्ल्ड कपमधल्या भारतीय टीमच्या कामगिरीवर मी निराश होतो. पण वर्ल्ड कपमध्ये आम्ही खराब क्रिकेट खेळलो होतो. २०१३ सालची घटना मात्र पूर्णपणे वेगळी होती. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगबद्दल देशभरात बोललं जात होतं.' असं धोनी या डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या भागात बोलला आहे. 'व्हॉट डिड वुई डू रॉन्ग' असं पहिल्या भागाचं नाव आहे.


चेन्नईला तीनवेळा आयपीएल जिंकवणाऱ्या धोनीला टीमवर कडक कारवाई होईल हे माहिती होतं. 'आम्ही शिक्षा भोगायच्या लायकच होतो. पण किती शिक्षा होईल, हे आम्हाला माहिती नव्हतं. अखेर टीमचं २ वर्षांसाठी निलंबन झालं. त्यावेळी संमिश्र भावना होत्या, कारण तुम्ही बऱ्याच गोष्टी वैयक्तिक घेता. कर्णधार म्हणून टीमने काय चुका केल्या हा प्रश्न असतो. हो आमच्या टीमकडून चूक झाली, पण खेळाडू यामध्ये सहभागी होते का? खेळाडू म्हणून आम्ही चूक केली का? हे सगळे प्रश्न मला पडत होते,' असं धोनी म्हणाला.


'मॅच फिक्सिंग करण्यासाठी बहुतेक सगळ्या खेळाडूंचा सहभाग असावा लागतो. पण मीडिया आणि सोशल मीडियामध्ये टीमच फिक्सिंगमध्ये सहभागी आहे, असं दाखवलं जात होतं. माझ्या स्वत:वरही फिक्सिंगचे आरोप झाले. मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग होऊ शकतं. कोणताही बॅट्समन, बॉलर किंवा अंपायर स्पॉट फिक्सिंग करु शकतो, पण मॅच फिक्सिंगसाठी बहुतेक सगळ्या खेळाडूंचा सहभाग लागतो,' अशी प्रतिक्रिया धोनीने दिली.


'या सगळ्या प्रकरणाबद्दल मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती. पण या गोष्टी सारख्या माझ्या डोक्यात येत होत्या. या सगळ्याचा मला माझ्या क्रिकेटवर परिणाम होऊन द्यायचा नव्हता. माझ्यासाठी क्रिकेट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे,' असं धोनीनं या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं. मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं धोनी या डॉक्युमेंट्रीच्या ट्रेलरमध्ये म्हणाला होता.


याआधी धोनी फिक्सिंग प्रकरणावर बोलला नव्हता. जुलै २०१५ साली चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं आयपीएलमधून २ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. या दोन्ही टीमचे महत्त्वाचे भाग असलेले गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांनी २०१३ सालच्या आयपीएलवेळी सट्टेबाजी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.


'भारताचा कर्णधार म्हणून या गोष्टी घडत असताना पत्रकार परिषदेला जाताना तुम्हाला याबद्दल गप्प राहावं लागणं हे सगळ्यात कठीण असतं. जेव्हा गुरुचं नाव समोर आलं तेव्हा तो चेन्नई टीमचा भाग होता, हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. पण त्याच्याकडे कोणती जबाबदारी होती? तो टीमचा मालक होता? व्यवस्थापक होता? का मोटिव्हेटर होता? हा वादाचा मुद्दा होता. टीम प्रशासनाने गुरूची ओळख टीमचा मालक अशी करुन दिली नाही, पण तो जावई होता, हे आम्हाला सगळ्यांना महिती होतं,' असं धोनी म्हणाला.