मुंबई : २०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्याआधी सगळ्या ८ टीमनी त्यांच्या काही खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवलं तर काहींना सोडून दिलं. यातले कायम ठेवण्यात आलेल्या अनेक दिग्गज खेळाडूंना मागच्या मोसमात म्हणावी तशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे या मोसमात त्यांना टीमनं दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवावा लागणार आहे. यातल्या काही खेळाडूंची आयपीएलमधली कारकिर्दच पणाला लागली आहे.


कायरन पोलार्ड



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डवर मुंबईनं विश्वास कायम ठेवला आहे. पोलार्डनं मागच्या काही वर्षांमध्ये मुंबईला अनेकवेळा जिंकवून दिलं आहे. फक्त आक्रमक बॅटिंगच नाही तर चित्त्यासारखी चपळ फिल्डिंग आणि बॉलिंगमध्येही पोलार्डनं महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पण २०१८ मध्ये मात्र पोलार्डला संघर्ष करावा लागला. फॉर्ममध्ये नसल्यामुळे पोलार्डनं फक्त ९ मॅचच खेळल्या. या ९ मॅचमध्ये त्यानं १९ ची सरासरी आणि १२८ च्या स्ट्राईक रेटनं १३३ रन केले. या कामगिरीमुळे पोलार्डला मुंबईची टीम सोडून देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. भारताविरुद्धच्या टी-२० वेळीही पोर्लाडची कामगिरी निराशाजनक झाली. आता आयपीएलमध्ये सिद्ध करण्यासाठी पोलार्डबरोबरच मुंबईच्या टीमलाही प्रयत्न करावे लागणारेत.


बेन स्टोक्स



मागच्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. राजस्थाननं स्टोक्सला १२.५ कोटी रुपये देऊन विकत घेतलं. पण मिळालेल्या किंमतीनुसार स्टोक्सला कामगिरी करता आली नाही. १३ मॅचमध्ये स्टोक्सनं ८.२८ च्या इकोनॉमी रेटनं ८ विकेट घेतल्या. तर १३ मॅचमध्ये त्यानं १६.३३ च्या सरासरीनं फक्त १९६ रन केले.


मनिष पांडे



भारताचा क्रिकेटपटू मनिष पांडेला मागच्या वर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतरही हैदराबादनं टीममध्ये कायम ठेवलं आहे. हैदराबादनं मागच्या वर्षी मनिष पांडेला ११ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. १५ मॅचमध्ये पांडेनं २३.८४ च्या सरासरीनं २८० रन केले होते. या मोसमात मात्र मनिष पांडेला स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे.


हरभजन सिंग



२०१८ सालच्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी न करताही हरभजन सिंगला चेन्नईच्या टीमनं कायम ठेवलं. मागच्या मोसमातल्या १३ मॅचमध्ये हरभजननं ८.८८ च्या सरासरीनं फक्त ७ विकेट घेतल्या. लसिथ मलिंगा आणि अमित मिश्रा यांच्यानंतर ३८ वर्षांचा हरभजन हा आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. निराशाजनक कामगिरी आणि वय लक्षात घेता हरभजनला चेन्नईनं टीममध्ये का कायम ठेवलं असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. 


युसुफ पठाण



युसुफ पठाणची २०१८ सालच्या आयपीएलमधली कामगिरी २०१७ पेक्षा चांगली होती. युसुफनं २०१७ साली १५ मॅचमध्ये १७.८७ च्या सरासरीनं १४३ रन केले होते. तर २०१८ मध्ये युसुफनं १५ मॅचमध्ये २८.८८ च्या सरासरीनं २६० रन केले होते. फोर आणि सिक्सची बरसात करणारा खेळाडू म्हणून पठाणची ओळख आहे. पण मागच्या २ वर्षात त्याला कामगिरीमध्ये सातत्य दाखवता आलं नाही. २०१९ मध्ये पठाणला मागच्या २ वर्षांमधलं अपयश धुऊन काढावं लागणार आहे.