बॅटवरील `तो` एक स्टीकर भोवला; क्रिकेट बोर्डाची तरुण खेळाडूविरोधात मोठी कारवाई
Fine By Cricket Board For Flag: भारतामध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या एका सामन्यानंतरही असा प्रकार घडला होता. यावेळीही राजकीय हेतूने प्रेरित भाष्य एका शतकवीराने केलं होतं.
Fine By Cricket Board For Flag: पाकिस्तानमधील नवोदित क्रिकेटपटू आझम खानविरोधात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने कठोर कारवाई केली आहे. आझम खानने एक गंभीर गुन्हा केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आझमच्या सामन्यातील मानधनामधून 50 टक्के रक्कम कापली आहे. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या आझम खानने कपडे आणि वस्तूंसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कराचीमध्ये झालेल्या नॅशनल टी-20 कपदरम्यान हा प्रकार घडला.
नेमकं घडलं काय?
झालं असं की, कराची व्हाईट्स आणि लाहोर ब्लूज या दोन संघादरम्यान नॅशनल स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात आझम हा कराची व्हाईट्सच्या संघाकडून खेळत होता. फलंदाजीला आलेल्या आझमच्या बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा होता. आझमच्या बॅटवरील झेंड्याच्या या स्टीकरची चांगलीच चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये झाली आणि क्रिकेट नियामक मंडळाच्या नजरेतूनही हा झेंडा सुटला नाही. या प्रकरणावर नंतर बोलताना आझमने बॅटवर स्टीकर असल्याने एवढा काही वाद होणार नाही असं आपल्याला वाटलं होतं, असं म्हटलं.
अधिकाऱ्याने दिली माहिती
"या तरुण फलंदाजाचं सामन्याचं 50 टक्के मानधन कापण्यात आलं आहे. यापूर्वीच फलंदाजाला इशारा देताना मान्यता नसलेले लोगो (पॅलेस्टाइनचा राष्ट्रध्वज) बॅठवर लावू नये असं सांगण्यात आलं होतं. यामुळे आयसीसीच्या नियमांचं उळ्लंघन होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीचा भाग असल्याने ही कारवाई करण्यात आली," असं या निर्णयाशी संबंधिक एका अधिकाऱ्याने 'जीओ न्यूज'ला दिलेल्या माहितीत सांगितलं.
वर्ल्ड कपमध्येही झालेला वाद
अशाप्रकारे स्टीकरमुळे आझम वादात अडकल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी त्याने दोन सामन्यांमध्येच अशीच स्टीकर असलेली वादग्रस्त बॅट वापरली होती. आझमने कोणतीही पूर्व सूचना न देता ही बॅट वापरलेली. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरु असून वर्ल्ड कप 2023 मध्येही शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने त्याचं शतक आणि पाकिस्तानचा विजय 'गाझामधील बंधू-भगिनींना समर्पित' केला होता. त्यावरुनही मोठा वाद झाला होता.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीने कपडे आणि क्रिकेटमधील वस्तूंसंदर्भातील काही नियम निश्चित केले आहेत. या नियांनुसार कोणतेही राजकीय, धार्मिक किंवा वर्णद्वेषी भाष्य करणारे संदेश कपडे अथवा मैदानात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून देत येत नाहीत. आझमने वापरलेल्या या बॅटवरुन सोशल मीडियावरही चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी आझमने पॅलेस्टाइनचा झेंडा लावलेली बॅट वापरण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तर इतरांनी क्रिकेट आणि राजकारण एकत्र करण्याची गरज नाही असा टोला लगावला आहे.